अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर तिष्ठत ठेवले; मनसे सैनिकांनी टोलनाकाच फोडला
अमित ठाकरे शिर्डीला उशीरा पोहोचले. अमित ठाकरे चार तास उशिरा शिर्डीत आले होते. शिर्डीत आल्यावर केवळ 20 सेकंद थांबून अमित ठाकरे निघून गेले. त्यामुळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच संतापले होते.
नाशिक | 23 जुलै 2023 : मनसे नेते अमित ठाकरे हे सध्या नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते त्यांच्याशी संवाद साधत आहेत. पक्ष बांधणीवर अमित ठाकरे जोर देत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दीही होत आहे. काल रात्री अमित ठाकरे यांना सिन्नर येथील टोल नाक्यावर अर्धा तास तिष्ठत उभं राहावं लागलं. अमित ठाकरे यांचाहा अपमान सहन न झाल्याने मनसैनिकांनी टोलनाकाच फोडला. मनसैनिकांनी प्रचंड राडा केला. त्यामुळे या भागात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला आहे. अमित ठाकरे यांचा ताफा टोल नाक्यावर अडवण्यात आला. त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यामुळे मनसैनिक संतप्त झाले. या संतप्त मनसैनिकांनी आक्रमक होत हा टोलनाका फोडला. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला. टोल नाका कर्मचाऱ्यांनी अरेरावी आणि गैरवर्तन केल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. तर, अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर अर्धा तास तिष्ठत ठेवल्याचा दावाही करण्यात येत आहे.
कर्मचारी पळाले
मनसैनिकांच्या या राड्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. काल रात्री 9 वाजता हा राडा झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. मनसैनिकांचं हे आक्रमक रुप पाहून टोलनाक्यावरील कर्मचारी पळून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणले.
मनसे पदाधिकारी अमित ठाकरेंवर नाराज
दरम्यान, अमित ठाकरे शिर्डीला उशीरा पोहोचले. अमित ठाकरे चार तास उशिरा शिर्डीत आले होते. शिर्डीत आल्यावर केवळ 20 सेकंद थांबून अमित ठाकरे निघून गेले. त्यामुळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच संतापले होते. या उद्विग्न झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी नामफलकाचे कव्हर फाडून आपला संताप व्यक्त केला. तसेच पक्षाचे राजीनामे देणार असल्याची भावनाही या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. महासंपर्क अभियानासाठी अमित ठाकरे दोन दिवस शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, कार्यकर्त्यांशी त्यांनी नीटसा संवादही साधला नसल्याने हे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
अमित ठाकरे साई चरणी
दरम्यान, अमित ठाकरे हे साई दरबारी आले. त्यांनी साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साई बाबांच्या दर्शनानंतर त्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेचा आढावा घेतला. मात्र, त्यांनी मीडियाशी संवाद साधण्यास नकार दिला. मात्र, अमित ठाकरे यांचं शिर्डीत जागोजागी जंगी स्वागत करण्यात आलं.