Malegaon Video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजी, 4 दिवसांनी तरूणाचा मृतदेह हाती! चक्क बाईकवरुनच नेली डेडबॉडी
बुधवार (दि.13) पासून या तरूणाचा अग्निशमन दल व त्याचे कुटुंबीय शोध घेत होते. अखेरीस चार दिवसानंतर या मुलाचा मृतदेह आढळून आला. गिरणा नदीला पूर आलेला असतानाही या तरूणाने स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत पाण्यात उडी घेतली होती.
मालेगाव : मालेगावात (Malegaon) एक धक्कादायक घटना घडलीयं. गिरणा नदीला आलेल्या पुरामध्ये स्टंटबाजी करण्याच्या नादात एक तरूण वाहून गेला होता. या तरूणाचा स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाला. गिरणा नदीला पूर आल्याने पाण्याची पातळी वाढली होती. मात्र, याचदरम्यान तरूण स्टंटबाजी करण्यासाठी नदीच्या (River) पुलावर चढला आणि चक्क पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यानंतर तरूणाचे नातेवाईक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी याचा शोध घेत होते. मात्र, तब्बल चार दिवसांनी आता या तरूणाचा मृतदेह (Dead body) सापडला आहे.
चार दिवसांनी तरूणाचा मृतदेह सापडला
नाशिक जिल्हात सात ते आठ दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडला. यामुळे जिल्हातील अनेक नद्यांना पूर आला. पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणारा तरूण वाहून गेला. मात्र, या मालेगावच्या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. मालेगाव शहरालगत असलेल्या गिरणा नदीच्या पुलावरून स्टंटबाजी करणाऱ्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह संवदगाव शिवारातील ओवाडी नाला परिसरात आढळून आला. नईम मोहम्मद अमीन (23, रा. किल्ला) असे या मुलाचे नाव आहे.
नातेवाईकांनी मृतदेह चक्क बाईकवरुन आणला
बुधवार (दि.13) पासून या तरूणाचा अग्निशमन दल व त्याचे कुटुंबीय शोध घेत होते. अखेरीस चार दिवसानंतर या मुलाचा मृतदेह आढळून आला. गिरणा नदीला पूर आलेला असतानाही या तरूणाने स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत पाण्यात उडी घेतली होती. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह चक्क सवंदगावातून मालेगाव शहरात शासकीय सामान्य रुग्णालयात मोटासायकलवर घेऊन आणल्याने मोठा संताप व्यक्त केला जातोयं.
रुग्णवाहिका आणि पोलिसांनाही कळवण्याची तसदी नाही
गेल्या चार दिवसांनी सापडलेला हा मृतदेह सवंदगाव येथील मासेमारी करणाऱ्याच्या जाळ्यात अडकून पडलेला होता. मृतदेह हा पूर्णपणे फुगलेला अवस्थेत सापडला आहे. स्टंटबाजी करण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांनाही कळवण्याची तसदी घेतली नाही आणि मृतदेह चक्क दुचाकीवर मालेगावात आणला. कहर म्हणजे दुचाकीवरून मृतदेह घेऊन जाताना व्हिडीओ देखील काढले आहेत.