‘संभाजीराजे तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?’, भुजबळांचा सवाल

संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केलीय. त्यांच्या टीकेला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे तुम्ही फक्त एका समाजी बाजू घेऊन कसं बोलता, तुम्ही तर संपूर्ण राज्याचे राजे आहात? असा सवाल भुजबळांनी सभाजीराजेंना उद्देशून केला. "घरेदारे कुणी जाळली? मी जाळली? दोन महिने जे घडलं त्यावर मी काही बोललो? घरेदारे जाळली तेव्हा तुम्ही बोलायला हवं होतं. तुमचं काम होतं राजे, नाही असं करु नका रे, असं सांगायला हवं होतं", असं छगन भुजबळ म्हणाले.

'संभाजीराजे तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?', भुजबळांचा सवाल
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 3:18 PM

नाशिक | 18 नोव्हेंबर 2023 : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज इगतपुरी येथील कार्यक्रमात भाषण केलं. यावेळी त्यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी संभाजीराजेंना आरक्षणाच्या प्रकरणात पडायला नको होतं, असं मत मांडलं. तसेच संभाजीराजे तुम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या गादीवर बसला आहात, त्यामुळे तुम्ही फक्त एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता? असा सवाल संभाजीराजेंनी केला. भुजबळांनी संभाजीराजेंना दिलेल्या प्रत्युत्तरावर आता संभाजीराजे काय भूमिका मांडतात? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

“संभाजीराजे म्हणाले की, भुजबळ दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करत आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. संभाजीराजे आम्ही तुमचा आदर, सन्मान करतो. कारण आमच्या हृदयात असलेले शाहू महाराज, जे मागासवर्गीयांना वरती आणण्यासाठी त्यांची बाजू घेऊन लढत होते, ते शाहू महाराज आहे. त्या शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही आहात. तुम्ही एका समाजाचे नाहीत. तुम्ही या राज्यातील सर्व समाजाचे आहात. तुम्ही एका समाजाची बाचू घेऊन कसं बोलता?”, असा सवाल छगन भुजबळांनी केला.

‘सर्वांचे अधिकार शाबूत ठेवा’

“एकतर तुम्ही या आरक्षणाच्या प्रकरणात यायलाच नकोत. आलात तर सांगितलं पाहिजे की, सर्वांचे अधिकार शाबूत ठेवा. कुणावरही अन्याय करु नका. ही अपेक्षा संभाजीराजेंकडून आम्हाला आहे”, असं मत छगन भुजबळ यांनी मांडलं. “घरेदारे कुणी जाळली? मी जाळली? दोन महिने जे घडलं त्यावर मी काही बोललो? घरेदारे जाळली तेव्हा तुम्ही बोलायला हवं होतं. तुमचं काम होतं राजे, नाही असं करु नका रे, असं सांगायला हवं होतं”, असं छगन भुजबळ म्हणाले.

‘राजे तुम्ही स्वत: बीडला जायला हवं होतं’

“राजे तुम्ही स्वत: बीडला जायला हवं होतं. जनतेची घरे, दुकानं, हॉटेल जाळण्यात आली. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. तुम्ही त्यांचे अश्रू पुसायला हवे होते. महाराज हे तुमचंही काम नाही का? पण तुम्ही सांगतात, हे भुजबळ करतो. लक्षात ठेवा महाराज, छगन भुजबळाला मंत्रिपदाची पर्वा नाही, ना आमदारपदाची पर्वा नाही. तो गोरगरीबांसाठी लढेल. पण तुम्ही राज्याचे महाराज आहात ना? छत्रपती शाहूंच्या गादीवर तुम्ही बसता, तर महाराज सर्वांना न्याय द्या. अन्याय होणार नाही याची काळजी घ्या”, असं छगन भुजबळ म्हणाले.