मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबाबतची मोठी अपडेट, ‘त्या’ पार्टीचं रहस्य उघड; बडगुजर यांची कबुली काय?
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीत नाचल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर चांगलेच अडचणीत आले आहेत. नाशिक पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बडगुजर यांची आज पाचव्यांदा चौकशी केली. या चौकशीत बडगुजर यांनी धक्कादायक माहिती दिल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे बडगुजर यांच्याच अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चैतन्य मनिषा अशोक, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 20 डिसेंबर 2023 : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीत ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर नाचल्याचा व्हिडीओ आला आणि राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. या प्रकरणाची चौकशीही सुरू झाली आहे. या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची चौकशीही करण्यात आली आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कुणाच्या अडचणी वाढणार? असा सवाल केला जात आहे.
ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा एकदा पोलीस चौकशी झाली. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाचव्यांदा बडगुजर यांची चौकशी केली. तब्बल दीड तास बडगुजर यांची चौकशी करण्यात आली. यावेळी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओबाबत महत्त्वाची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. पार्टी झालेले फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बडगुजर यांच्या नातेवाईकांच्या घरी पार्टी कुणी दिली? तिथे सलीम कुत्ता काय करत होता? आदी प्रश्न निर्माण झाले आहेत.
आडगाव शिवारात पार्टी
नाशिकच्या आडगाव शिवारातील एका फार्म हाऊसवर ही पार्टी झाली होती, असं बडगुजर यांच्या चौकशीतून उघड झाल्याचं सांगितलं जात आहे. दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांनी ही पार्टी केल्याचा आरोप आहे. आमदार नितेश राणे यांनी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ विधानसभेत दाखवत आरोप केला होता. त्यामुळे राज्याचं राजकारण तापलं होतं. बडगुजर यांनी या प्रकरणी आपली भूमिकाही मांडली होती.
उद्या पुन्हा चौकशी
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 17 ते 18 जणांची चौकशी केली आहे. बडगुजर यांचे वकील आज नव्हते. त्यामुळे बडगुजर यांनी पोलिसांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचं कळतं. त्यामुळे बडगुजर यांची उद्या पुन्हा चौकशी होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
दीड तास चौकशी
ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची आजची चौकशी पूर्ण झाली आहे. गुन्हे शाखेच्या कार्यालयात तब्बल दीड तास त्यांची चौकशी झाली. गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी त्यांची चौकशी केली.