Nashik | नाशिककरांनो सावधान, शहरात पुन्हा कडक हेल्मेटसक्ती, 1 हजाराच्या दंडासोबत….
नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे अजूनही हेल्मटसक्तीवर ठाम आहेत. त्यांनी शहरवासीयांना हेल्मेट वापरा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिलाय.
नाशिकः नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे अजूनही हेल्मटसक्तीवर ठाम आहेत. त्यांनी शहरवासीयांना हेल्मेट वापरा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिलाय. आता वाहनचालक दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळ्यास त्याला चक्क 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांनो आणि विशेषतः कॉलेजकुमारांनो दुचाकीवर घराबाहेर पडताना आपले हेल्मेटसोबत आहे का, याची खात्री जरूर करून घ्या.
का केली हेल्मेटसक्ती?
नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल धोरण सुरू केले होती.
समुपदेशनाचा डोस
नो हेल्मेट, नो पट्रोल ही मोहीम चांगलीच चर्चेत राहिली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांचे समुपदेशन सुरू केले. त्यानुसार दुचाकीस्वारांना लगेच दंडाची पावती नाही, तर दोन तासांच्या समुपदेशनाचा डोस दिला. या उपदेशानंतर संबंधितांस एक प्रमाण पत्र देऊन सोडण्यात आले. या मोहिमेनंतर पुन्हा एकदा पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. तसे आदेश काढले. मात्र, या मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
पुन्हा आयुक्त आक्रमक
आता पुन्हा एकदा पोलीस आयुक्त आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता वाहनचालक दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळ्यास त्याला चक्क 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे आणि 3 महिने वाहन परवाना निलंबित करू, असा इशारा दिला आहे. हेल्मेट वापरा आणि कारवाई टाळा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या आवाहनाला शहरवासीय कसा प्रतिसाद देतात, ते पाहावे लागेल.
वाढत्या गुन्ह्यांचे काय?
नाशिक गेल्या महिन्यात एकाच आठवड्यात झालेले तीन खून आणि तीन दरोड्यांनी हादरून गेले होते. या खून प्रकरणावरून राजकारणही झाले. त्यानंतरही अनेक गुन्हेविषयक बातम्या रोज कानावर पडत आहेत. नाशिकची क्राईनगरीकडे वाटचाल सुरू आहे, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांच्या नाड्याही आवळाव्यात, अशी मागणी होताना दिसतेय. याकडे पोलीस आयुक्त लक्ष देणार का, असा सवाल केला जात आहे.
इतर बातम्याः
नाशिककरांना 2 तासांत दिल्ली गाठता येणार; जानेवारीत विमानसेवा होणार सुरू, गोव्यासाठीही हवाहवाई…!