Ajit Pawar | ‘सध्या बदनामी करायचं काम सुरुय’, अजित पवार संतापले, नाराजीच्या चर्चांनंतर पहिलं भाषण
अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांनंतर ते आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कवळण येथे शेतकरी संवाद मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी सध्याच्या विविध घडामोडींवर भूमिका मांडली.
नाशिक | 7 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांनंतर ते आज पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान कळवण येथे शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी सर्वांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. अजित पवार यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. अजित पवार नाराज आहेत. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. गेल्या आठवड्यात अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील गेले नाहीत. त्यामुळे चर्चांवरुन विरोधकांकडूनही सरकारवर निशाणा साधला जात होता.
अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांवर त्यांनी काही ठोस अशी प्रतिक्रिया दिली नाही. ते आजारी असल्याने मंत्रिमंडळ बैठकीला गेले नव्हते, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याच मुद्द्यावरुन सरकारवर सडकून टीका केली होती. त्यामुळे अजित पवार यांनी नाराजीच्या चर्चांनंतर आज पहिल्यांदा जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. विरोधकांकडून फक्त बदनामी करण्याचं काम सुरुय, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“मित्रांनो, मी आज तुम्हा सर्वांना सांगतो. कारण नसताना सगळीकडे बदनामी चालली आहे. दीड लाख एवढी नोकर भरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे. पण काही जण कंत्राटीची नोकर भरती असल्याचं सांगून तरुणांची दिशाभूल करत आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
“कंत्राटी संदर्भात मी आपल्या सर्वांना उदाहरण देतो. कधीकधी तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्सेस निवृत्त होतात, तातडीने भरती करावी लागते, भरती एका दिवसात होत नाही. त्यासाठी 6 महिने, 1 वर्ष जातं. त्यावेळेस नवीन भरती होईपर्यंत आपण कॉन्ट्रॅक्ट भरती करतो. कारण समजा एकाखा विषय शिकवणारा शिक्षकच निवृत्त झाला तर मुलांना काय सांगायचं? आता शिक्षक निवृत्त झालाय, नवीन शिक्षक आल्यावर तुम्हाला शिकवेल, असं सांगून चालेल? तर नाही चालणार”, असं अजित पवार म्हणाले.
“मी महाराष्ट्रात अनेक वर्ष सरकार म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. कधीही दीड लाखाची भरती अशी झाली नव्हती. ती आता तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य विभाग, कृषी विभागत, जलसंपदा, जलसंधारण विभाग या विभागांमध्ये भरती होत आहे”, अशी माहिती अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या सुनावणीवर अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगात नुकतीच सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अजित पवार यांच्या गटाने जोरदार युक्तिवाद करत पक्षावर दावा सांगितला. आमच्याकडे लोकप्रतिनिधींचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे आम्हालाच पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात यावं, अशी मागणी अजित पवार गटाने केला. यावेळी अजित पवार गटाने शिवसेनेच्या निकालाचादेखील दाखला दिला.
या सुनावणीवर अजित पवार यांनी भाषणात कोणीतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. पण छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. “आदरणीय शरद पवार म्हणाले होते कोर्ट कचेरी करणार नाही, आणि तेच तिकडे गेले. माझ्याच बंगल्यावर राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह ठरवलं गेलं. तुमचा मोठा वाटा पण आमचा पण खारीचा वाटा आहे की नाही? आम्ही का गेलो, याचे कारण वारंवार सांगितले. आम्हीच नाही तर तुमच्यासोबत असलेल्या अनेक लोकांनी तेच सांगितले. सगळे आमदार आणि खासदार आमच्यासोबत आहेत. 1 आमदार 3 लाखांचा प्रतिनिधी आहे. न्यायाचा तराजू अजित दादांचा दादांच्या बाजूनेच सुटणार”, असं छगन भुजबळ म्हणाले.