तुम्ही मोदी यांना विष्णूचा अवतार म्हणता, आम्ही काय म्हणतो?; छगन भुजबळ यांनी भाजपला सुनावले
तुम्ही मोदींना विष्णूचा आवतार म्हणता. त्यावेळी आम्ही काय म्हणालो? ठिक आहे. तुम्हाला ते विष्णूचे आवतार वाटतात तर म्हणा तुम्ही. आमचं काहीच म्हणणं नाही.
चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे जाणता राजा असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. त्यावरून भाजपने राष्ट्रवादीला घेरण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आमच्यासाटी शरद पवार जाणते राजेच आहेत, असं विधान केल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. बावनकुळे यांच्या या हल्ल्याला भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचा अवतार म्हणता त्यावर आम्ही काय म्हणतो का? असा सवालच छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी हस्यास्पद, न पटणारी विधाने करू नये. शरद पवार यांना जाणता राजा का म्हणालो याचं स्पष्टीकरण केलं आहे. एका फटक्यात शेतकऱ्यांचे 80 हजार कोटी रुपये कर्जमाफ केलं. उद्योगधंदे आणले. देशाच्या राज्याच्या विकासात योगदान दिलं. या वयात सर्व अडचणीवर मात करून ते लोकांच्या मदतीसाठी धावत आहेत.
म्हणून मी त्यांना जाणता राजा म्हणालो. याचा अर्थ मी त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करतो असं नाही. ते चांगलं काम करतात म्हणून बोलतो, असं छगन भुजबळ म्हणाले.
महात्मा बसवेश्वर होते. त्यानंतर आपण दुसरे महात्मा म्हणून आपण महात्मा फुल्यांना बोलू लागलो. तिसरे महात्मा म्हणून गांधीजींना संबोधू लागलो. अडचण काय आहे? चांगलं काम करणाऱ्याला एखादं विशेषण दिलं तर अडचण काय आहे? असा सवाल भुजबळांनी केला.
तुम्ही मोदींना विष्णूचा आवतार म्हणता. त्यावेळी आम्ही काय म्हणालो? ठिक आहे. तुम्हाला ते विष्णूचे आवतार वाटतात तर म्हणा तुम्ही. आमचं काहीच म्हणणं नाही. आम्हाला पवार साहेब गोरगरीबांचा जाणता राजा वाटतात.
म्हणून आम्ही त्यांना जाणात राजा म्हणतो. काय अडचण काय आहे? आम्ही तुमच्यावर टीका केली नाही. तुम्ही विष्णूचा अवतार कसं काय म्हणता? असा सवाल केला नाही. तुम्ही तुमच्या नेत्यांना काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा, असंही ते म्हणाले.
महात्मा वगैरे पदव्या या भारतरत्ना सारख्या पदव्या नसतात. त्या जनतेतून दिलेल्या असतात. पवारांना जनतेनेच जाणता राजा म्हटलं. लोकांच्या अडचणीला पवार धावून जातात म्हणून लोकांना त्यांना ही पदवी दिली. तुम्हाला काय अडचण आली?
तुम्ही मोदींना विष्णूचा अवतार म्हणता मला काही अडचण वाटली नाही. त्रास होत नाही. कशाला वाद वाढवत आहात? असा सवालही त्यांनी केला.
विरोधी पक्षावर माझा डोळा आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. माझा कशावरच डोळा नाही. माझा डोळा हा फक्त बावनकुळेंवर आहे. आमच्यात भांडणं लावायला आम्ही काही राजकारणात अपरिपक्व नाही. मला राजकारणात 56 वर्ष झाली. त्यामुळे असं कुणी काही तरी लावून देईल आणि आम्ही बहकू असं काही होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.