सुनेचा सासऱ्याला सल्ला, मराठा आरक्षणावरून जुंपली; रक्षा खडसे काय म्हणाल्या नाथाभाऊंना?
भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे सासरे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या एका विधानाचा समाचारही घेतला आहे.
भुसावळ | 6 सप्टेंबर 2023 : राज्यात एकीककडे काका आणि पुतण्याची जुंपलेली असतानाच आता सुनेने सासऱ्याला एका महत्त्वाच्या विषयावर महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना त्यांची सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आरक्षण प्रश्नावर रक्षा खडसे यांनी सासऱ्याला चार मोलाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे सून आणि सासऱ्यातील वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. तर, सासरे नाथाभाऊ आता सुनेला काय उत्तर देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रक्षा खडसे या रावेरच्या भाजपच्या खासदार आहेत. त्या भुसावळमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सासऱ्याला सल्ला दिला. नाथाभाऊंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. एकनाथ खडसेंनी जालना लाठीमारवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोद यांना साकडं घालून आरक्षण आणावं अशी टीका केली होती. त्यावर खासदार रक्षा खडसे यांनी याबाबत नाव न घेता एकनाथ खडसेंचा समाचार घेतला.
सुनेचा सल्ला काय?
मागच्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते मिळू शकले नाही. आजही आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं सांगतानाच आरक्षणाबाबत विरोधकांनी राजकारण न करता मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवा. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करायला हवं, असा सल्ला रक्षा खडसे यांनी दिला आहे.
मग आताच का?
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुक्ताईनगरात येऊन भाजपवर टीका केली होती. भाजप हे फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवार यांच्या या टीकेचाही रक्षा खडसे यांनी समाचार घेतला. रोहित पवार यांनी यापूर्वी कधीच लोकांमध्ये येऊन सभा घेतली नाही. त्यांना तशी गरजही वाटली नाही. याआधी त्यांनी जळगावत सभा घेतल्या नाहीत. मग आताच का? असा सवाल त्यांनी केला.
मग त्यात वेगळं काय?
फोडाफोडीचे राजकारण राष्ट्रवादीने याआधी केलं होतं. आज वेगळं काय? आधी राष्ट्रवादीचा सहकारी अलायन्स पक्ष हा काँग्रेस होता. शिवसेना कधीच राष्ट्रवादीचा मित्र पक्ष नव्हता. शिवसेने सोबत राष्ट्रवादीने जाऊन सत्ता स्थापन केली. मग आम्ही भाजपानेही त्याच मार्गाने सत्ता स्थापन केली तर त्यात वेगळं काय?, असा सवाल रक्षा खडसे यांनी केला आहे.