रोहित पवार यांच्या ‘त्या’ विधानाने अजितदादा गटाला घाम फोडला; म्हणाले, चिन्ह असलं काय नसलं काय, आमच्याकडे…
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगामध्ये असलेल्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी विधान केलं होतं. चिन्ह आणि पक्ष आपल्यालाच मिळेल असं प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. पटेलयांच्या या विधानाचा आमदार रोहित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला आहे
जळगाव | 4 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला आहे. त्यासाठी निवडणूक आयोगातही धाव घेतली आहे. आपलाच पक्ष खरा असं दोन्ही गटाचं म्हणणं आहे. अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आम्हालाच पक्षचिन्ह मिळेल असा दावा केला आहे. त्यावर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. एवढेच नव्हे तर रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना अहंकारी म्हणून संबोधले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पटेल विरुद्ध पवार अशी जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगावात एका कार्यक्रमानिमित्ताने आले असता रोहित पवार यांनी ही टीका केली आहे.
जळगावातील खेडी येथे राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. त्यानंतर आमदार रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते. चिन्ह असलं काय आणि नसलं काय आमच्याकडे शरद पवार आहेत. तुमच्याकडे जे चिन्ह आहे ते तुम्ही ठेवा. मात्र अख्खा महाराष्ट्र हा शरद पवारांसोबत राहून लढणार आहे. आम्ही विचारासाठी लढणार. स्वार्थी राजकारण आम्हाला जमत नाही, अशी जोरदार टीका रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचं नाव न घेता केली.
चिन्हाची चिंता तुम्ही करा
1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष स्थापन झाला. त्यावेळी लोकांनी घड्याळाकडे बघितलं नव्हतं, तर शरद पवार साहेबांकडे बघितलं होतं. त्यामुळे चिन्ह असलं काय आणि नसलं काय शरद पवार साहेब आमच्यासोबत आहेत. आम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही. चिन्हाची चिंता तुम्ही घ्या, असा टोला त्यांनी लगावला. चिन्ह आम्हालाच मिळेल. त्यांना नवीन पक्ष काढावा लागेल. आम्हालाही कायद्याचा अभ्यास आहे. निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा दावाही त्यांनी केला.
दोन महिन्यातच अहंकार आला
आम्ही म्हणत होतो भाजपच्या नेत्यांमध्ये अहंकार आहे. दोन महिने लागले यांच्यामध्ये अहंकार यायला. भाजपचे नेते यांना सांगतात, निवडणूक आयोग आपलंच ऐकतं. त्यामुळेच हा अहंकार प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये आलेला दिसतोय. निवडणूक आयोगाच्या आधीच हे निर्णय देतात. यावरूनच समजून घ्या की निवडणूक आयोग भाजपाचे कदाचित ऐकतंय, असा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांना सहकार्य करा
जालना जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्ह राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहेत. तसेच काही भागात बस सेवा देखील बंद आहेत. बससेवा खंडित झाल्याने सद्यस्थितीला सरळसेवा परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याबाबत अनेक विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी आपण सर्वांनी नेहमीप्रमाणे सहकार्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.