Video : धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं, संजय राऊत यांची सटकली; अजितदादा यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर
शिवशाहीशी गद्दारी केली. शिवसेनेशी गद्दारी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. ते काल रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचा जयजयकार करत होते. त्यांच्याकडून काय अपेक्षा करता? हे सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडेंसारखे लोक आहेत.
नाशिक : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे काल प्रतिक्रिया देताना शिंदे गटाच्या नेत्याचं नाव घेताच थुंकले. मीडियात हा क्षण कैद झाला. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांनीच संयमाने वागलं पाहिजे, असा टोला संजय राऊत यांना लगावला. अजितदादांचा हा सल्ला संजय राऊत यांना पचनी पडलेला नाही. राऊत यांनी त्यावरून थेट अजितदादांवर खोचक टीका केली आहे. धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. संयम तर राखला पाहिजे सर्वांनी बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी अजितदादांवर टीका केली. आम्ही भोगूनही जमिनीवर आहोत. इकडे तिकडे पळालो नाही. माझ्या पक्षाबरोबर आम्ही ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा, आमच्यावर संकट येतात म्हणून भाजपसोबत सूत जुळवण्याचा आमच्या मनात विचार येत नाही, असा टोलाही राऊत यांनी अजितदादांना लगावला.
संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. थुंकल्याबद्दल आपण माफी मागणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या देशातील 130 कोटी लोकांना माफी मागावी लागेल. रोज ते कुठे ना कुठे थुंकत असतात. मी राजकीय लोकांचे नाव घेतल्यावर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. ज्यांनी महाराष्ट्र, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी बेईमानी केली. त्यांचं नाव ऐकल्यावर माझी जीभ चावली गेली. त्यातून थुंकलं गेलं. यांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र काही कळतं का? मानसशास्त्रं कळतं का? माझ्या इतकं चांगलं संतुलन कुणाचंच नाही. माझ्यामुळे इतरांचं संतुलन बिघडलं आहे. हे त्यांनी मान्य करावं, असं संजय राऊत म्हणाले.
ते बिनडोक आहेत
त्यांना ना काम ना धंदा. ना कार्यकर्ते, कशा करता जोडे मारत आहेत? लोकांनी वर्षभरात त्यांना प्रचंड जोडे मारले आहे. लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत त्यांना जोडे मारण्यासाठी. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण ते भावनाशून्य आहेत. बेईमानी करणाऱ्यांना जोडे मारण्याचा अधिकार काय आहे? जोडे मारावे असं काय केलं आम्ही? विषय समजून घेत नाही. बिनडोक आहेत. त्यांना आजच्या दिवशी काम मिळालंय. त्यांना प्रसिद्धी द्या. त्यांची बेईमानी कळू द्या. अशा जोडे मारल्याने शिवसेनेवर परिणाम होणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
थुंकणं हा संस्कृतीचा भाग
मी कुणावर थुंकलो? हे वीर सावरकरांचे भक्त आहेत. सावरकरांना न्यायालयात आणण्यात आलं होतं. त्यांची माहिती देणारा बेईमान माणूस समोर उभा होता. त्याच्याकडे बघून सावरकर थुंकले हे इतिहासात नोंद आहे. थुंकणं हा हिंदुसंस्कृतीचा भाग आहे. पण मी कोणावरही थुंकलो नाही. वीर सावरकरांनी सुद्धा आपला संताप बेईमानावर व्यक्त केला होता, असं ते म्हणाले.
मी सावरकरांचा भक्त आहे. सावरकर, ठाकरे, टिळकांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. चीड आणि संताप कोणत्याही प्रकारे व्यक्त होत असते. तुम्ही जे म्हणत आहात थुंकलो थुंकलो… कुठे थुंकलो? माझ्या दाताचा प्रॉब्लेम होता त्यामुळे थुंकल्यासारखे वाटले असेल. त्यांना वाटतंय आपल्यावर लोक थुंकत आहेत. आपल्याला लोक जोडे मारत आहेत. ही त्यांची मानसिकता आहे. लोकं त्यांच्यावर थुंकतात हे खरं आहे. पण ते मी का व्यक्त करू, असंही ते म्हणाले.