काँग्रेसच्या युवा नेत्याचा अपघाती मृत्यू; दानवे यांच्या घरासमोरील आंदोलनाने आले होते चर्चेत
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे मानस पगार यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. पगार यांनी रावसाहेब दानवे यांच्या घरासमोरच आंदोलन छेडलं होतं.
नाशिक: नाशिक (ग्रामीण) जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झालं आहे. बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मानस पगार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. एका उमद्या आणि तरुण नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. मानस पगार यांच्या पार्थिवावर आज सकाळी पिंपळगाव बसवंत या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली
माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. pic.twitter.com/R7Qfcv5aRr
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 2, 2023
मानस पगार हे नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय तरुण नेते होते. राजकारणातील तरुण चेहरा म्हणून ते नावारुपाला येत होते. मात्र, अचानक झालेल्या अपघातामुळे मानस पगार यांचं निधन झालं. मानस यांच्या निधनाचा त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या दु:खद घटनेमुळे नाशिकमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय क्षेत्रातूनही मानस पगार यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.
मानस पगार हे काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांचे निकटवर्तीय होते. सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. आज निकाल लागणार आहे. त्याच दिवशी सकाळी ही दु:खद बातमी येऊन धडकल्याने तांबे यांनाही धक्का बसला आहे. सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतरही मानस पगार त्यांच्यासोबत होते. त्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला होता. तांबे यांच्या प्रचारातही ते सहभागी झाले होते.
माझा खंबीर पाठीराखा
मानस पगार यांच्या निधनावर सत्यजित तांबे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. नि:शब्द करणारी बातमी आहे, असं ट्विट करून तांबे यांनी मानस यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दानवेंच्या घरासमोर आंदोलन
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे मानस पगार यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. पगार यांनी रावसाहेब दानवे यांच्या घरासमोरच आंदोलन छेडलं होतं. पगार यांनी दानवे यांच्या घरासमोर उपोषण केलं होतं. त्यावेळी पगार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
युवक काँग्रेसच्या सुपर 1000 मुख्यपदी निवड
दरम्यान, मानस यांची 2020मध्ये युवक काँग्रेसच्या सुपर 1000 मुख्यपदी निवड झाली होती. सुपर 1000 ही मोहीम काँग्रेसने हाती घेतली होती. या मोहिमेंअतर्गत तरुणांना काँग्रेसशी जोडून घेण्यात येत होतं. हे युवा जोडो अभियान होतं. त्याच्या मुख्य समन्वयकपदाची सूत्रे मानस यांच्याकडे सोपवण्यात आली होती.