गावातील भांडणामुळे मुंबईत आले… सलमानच्या फार्म हाऊसमध्ये लपून… पुढे काय घडलं?
अभिनेता सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर दोन तरुण घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांची कसून चौकशी केली. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता पोलिसांनी या दोघांनाही नोटिस बजावली आहे. त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे.
पनवेल | 9 जानेवारी 2024 : अभिनेता सलमान खान याच्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली आहे. या चौकशीत हे दोन्ही तरुण गावाकडून आल्याचं कळलं आहे. त्यांचा सलमानला दुखापत पोहोचवण्याचा इरादा नव्हता. फक्त सलमान खानला त्यांना भेटायचं होतं. पोलिसांनी या दोघांचीही कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून अजून माहिती मिळाली आहे.
पनवेल तालुक्यातील वाजे गावात अभिनेता सलमान खान यांच्या वडिलांच्या मालकीच्या असलेल्या शेतघरात 4 जानेवारीला दुपारी दोन तरुणांनी शिरण्याचा प्रयत्न केला. कुंपणाच्या तारा ओलांडून या दोन तरुणांनी शिरण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर नवीन पनवेल पोलिसांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दोघेही सुतार
हे दोन्ही तरुण पंजाबच्या फाजिलका जिल्ह्यातील रामपुरा गावातील आहेत. अजेशकुमार गिला (वय 23) आणि गुरुसेवकसिंग सिख (वय 23) असं या दोघांचं नाव आहे. दोघेही सुतारकाम करतात. गावात भांडण झाल्यामुळे हे दोघे मुंबईत आले होते. दोघेही बोरिवलीच्या एका विश्रामगृहात थांबले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
अन् दोघे पकडले गेले
या दोघांकडे ओळखपत्र मागितल्यावर या दोघांनी महेशकुमार रामनिवास आणि विनोदकुमार राधेशाम या नावाची ओळखपत्रे दिली. मुंबईत जाऊन या दोघांनी अनेक अभिनेत्यांची भेट घेतली असल्याचं चौकशीत आढळून आलं आहे. अभिनेता सलमान खान त्यांच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर सहज भेटू शकतो, असं वाटल्याने हे दोघे तरुण पनवेलमधील वाजे गावात आले होते. पण सलमानच्या फार्महाऊसच्या तारेच्या कुंपणामधून प्रवेश करत असतानाच या दोघांना रखवालदार मोहम्मद हुसेन यांनी पकडले, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत ‘अर्पिता’ फार्महाऊसचे व्यवस्थापक शशिकांत ओमप्रकाश (शर्मा) भार्गव यांनी नवीन पनवेल पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी या दोन्ही तरुणांना नोटीस बजावली आहे. त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासही सांगितलं आहे.