नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा आघाडीचा डाव, पण पालिकेत भाजपचीच सत्ता येणार: फडणवीस
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा आघाडी सरकारचा डाव आहे. पराभवाची भीती वाटत असलेल्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे. (bjp will win navi mumbai corporation election, says devendra fadnavis)
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा आघाडी सरकारचा डाव आहे. पराभवाची भीती वाटत असलेल्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे. पण कितीही काहीही केलं तरी नवी मुंबई महापालिकेत भाजपचीच सत्ता येईल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (bjp will win navi mumbai corporation election, says devendra fadnavis)
देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत होौते. आमदार गणेश नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीअंतर्गत आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 9 जीवरक्षक रूग्णवाहिकांचे फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई महापालिकेला या रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. कोरोना व अन्य रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचण्यास या रुग्णवाहिकांमुळे मदत मिळणार आहे. रुग्णवाहिका लोकार्पणाबरोबरच स्पर्धा परिक्षांसाठी पालिका ग्रंथालयांना पुस्तके व पालिकेच्या विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठांना विरंगुळा साहित्याचे वाटपही याप्रसंगी करण्यात आले.
याप्रसंगी आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार रमेश पाटील, आमदार नरेंद्र पाटील, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फडणवीस बोलत होते.
जास्त जागा जिंकू
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे सरकार करत आहे. राज्यात जिल्हा बँकेच्या आणि अन्य निवडणुका घेतल्या जातात. ज्या निवडणुका सोयीच्या आहेत त्या घेण्यासाठी निवडणूक आयोगाला सकारात्मक रिपोर्ट दिला जातो. त्या निवडणुका अडचणीच्या आहेत तिथे मात्र कोरोनाची भीती व्यक्त केली जाते. अशा ठिकाणी निवडणुका घेतल्या जात नाहीत. नवी मुंबईमध्ये आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली जनतेची कामे होत आहेत. त्यामुळे उशिरा जरी नवी मुंबई महापालिका निवडणूक घेतली तरी सध्या असलेल्या जागापेक्षा जास्त जागा भाजपाला मिळतील, असा दावा त्यांनी केला.
राऊतांवर टीका
महाराष्ट्रामध्ये दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याकडे कानाडोळा करून दिल्लीत आंदोलन करणं म्हणजे काँग्रेसचा ढोंगीपणा असल्याची टीका त्यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर केली. तसेच महाराष्ट्रात दलितांवर कसे कसे अन्याय होत आहे, याचा पाढाच त्यांनी वाचला. या ठिकाणी राऊत का गेले नाहीत? ते दिल्लीत आंदोलनाला कसे गेले? असा सवालही त्यांनी केला.
आरक्षणच द्यायचं नाही
केंद्र सरकारने 121वी घटना दुरुस्ती करून राज्यांना मागास प्रवर्ग ठरविण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु महाराष्ट्र सरकारलाच मराठा आरक्षण द्यायचं नाही. मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाला अद्याप एम्पिरिकल डेटा तयार करण्यासाठी सूचित करण्यात आलेले नाही. मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासाठी मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून दिलेला नाही. स्वतःच अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असतं, अशी टीकाही त्यांनी केली.
लसी आकाशातून पडल्या का?
केंद्र सरकारवर लसींच्या तुटवड्याचा आरोप होत असेल तर महाराष्ट्रामध्ये विक्रमी लसीकरण केल्याचा दावा महाविकास आघाडीचे सरकार कोणत्या आधारावर करते आहे? सर्वाधिक लसीकरण करण्याची जाहिरात राज्य सरकारकडून कशाच्या आधारे केली जात आहे? या लसी आकाशातून पडल्या की जमिनीखालून उगवल्या?, असे सवालही त्यांनी यावेळी केले.
या ठिकाणी रुग्णवाहिका कार्यरत राहणार
गणेश नाईक यांनी रुग्णवाहिका दिल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल, असे नमूद करून नवी मुंबईसाठी आणखी कार्डियाक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. लोकार्पण करण्यात आलेल्या आठ रूग्णवाहिका या नवी मुंबई महापालिकेच्या दिघा, रबाळे, खैरणे, पावणे, घणसोली, तुर्भे आणि जुहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असणार आहेत. आधुनिक जीवरक्षक प्रणाली असणारी रुग्णवाहिका पालिका रूग्णालयाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत असणार आहे.
गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टची रुग्णवाहिका संपूर्ण नवी मुंबईत सेवेत उपलब्ध असणार आहे. नवी मुंबईतून एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देणाऱ्यांचा टक्का वाढतो आहे. या उमेदवारांना या परीक्षांमधून यश मिळावे यासाठी या परीक्षांच्या अभ्यासासाठी पुस्तके आमदार निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पुस्तकांचे संच पालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. ज्येष्ठांसाठी काही क्षण आनंदाचे जावेत यासाठी त्यांच्याकरीता विरंगुळा केंद्रांची संकल्पना सर्वप्रथम नवी मुंबईत राबविण्यात आली. ज्येष्ठांचा विरंगुळा केंद्रातील वेळ आणखी सुखकारक जावा यासाठी या केंद्राला विरंगुळा साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.
नाईकांचे सेवा कार्य
मार्च 2020मध्ये नवी मुंबईत कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला तेव्हापासूनच गणेश नाईक यांनी मदतकार्यास सुरूवात केली. लॉकडाऊनच्या काळात धान्यवाटप, परप्रांतीयांना गावी जाण्यासाठी मदत, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नवाटप, संपूर्ण नवी मुंबईत 10 लाख मास्कचे मोफत वाटप, आर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आयुर्वेदिक गोळयांचे वाटप करण्यात आले. आजपर्यंत चार टप्प्यात जवळपास 3 हजार टन धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. औषध फवारणी मशीन व फवारणी औषध मोफत वितरित करण्यात आले आहे.
ऑक्सिजन निर्मितीसाठी एक कोटींचा निधी
नाईक यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. कोरोनाची खबरदारी आणि लसीकरणाची आवश्यकता या बद्दल जनजागृती करण्यात आली. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत नाईक यांनी आजपर्यत 45 पेक्षा अधिक कोरोना प्रतिबंधात्मक बैठका घेवून त्यामधून मौलिक सुचना केल्या. त्यांच्या मागणीनुसार सिडको प्रदर्शनी केंद्रात 1100 खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभे राहिले. महापालिकेची स्वतःची कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभी राहिली. नवी मुंबईत कोरोना रूग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होवू नये यासाठी एक कोटी रुपयांचा आमदार निधी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी त्यांनी दिला आहे. या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक व्हेंटिलेटर खरेदीसाठी देखील पालिकेला निधी दिला आहे. गृहनिर्माण सोसायटयांमधील सुरक्षा रक्षक, घरकामगार, वाहनचालक इत्यादी घटकांचे मोफत लसीकरण करून घेतले आहे. (bjp will win navi mumbai corporation election, says devendra fadnavis)
Video | 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 12 August 2021#News | #NewsUpdate | #NewsAlert https://t.co/ByCX4uCFe3
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 12, 2021
संबंधित बातम्या:
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी; विनायक मेटेंचं आवाहन
(bjp will win navi mumbai corporation election, says devendra fadnavis)