Ganesh Naik case : ‘एक दो एक दो, गणेश नाईक को फेक दो’, गणेश नाईकांना अटक करण्यासाठी महिलांचं पोलीस आयुक्तालयाबाहेर उग्र आंदोलन
Ganesh Naik case : भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केली असून आता नाईक यांच्या अटकेची मागणी होऊ लागली आहे. आज महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी वाशी पोलीस आयुक्तालयाबाहेर जोरदार आंदोलन करत नाईक यांच्या अटकेची मागणी केली.
नवी मुंबई: भाजप नेते गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केली असून आता नाईक यांच्या अटकेची मागणी होऊ लागली आहे. आज महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) महिला कार्यकर्त्यांनी वाशी (vashi) पोलीस आयुक्तालयाबाहेर जोरदार आंदोलन करत नाईक यांच्या अटकेची मागणी केली. एक दो एक दो, गणेश नाईक को फेक दो, नही चलेगी नही चलेगी, नाईक की दादागिरी नही चलेगी, अरे अटक करा, अटक करा, गणेश नाईकांना अटक करा, अशा घोषणा देत या महिला कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. एक पीडित महिलेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतरही पोलीस त्यांना अटक का करत नाहीत? पोलीस कशाची वाट पाहत आहेत? असा संतप्त सवाल या महिला आंदोलकांनी केला आहे. या निदर्शनात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून गणेश नाईक यांच्याविरोधात सीबीडी बेलापूर आणि नेरुळमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तक्रारीनंतरही नाईक यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याने येथील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळेच आज महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज वाशी पोलीस आयुक्तालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी महिलांनी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत आपला संतापही व्यक्त केला. एक दो एक दो गणेश नाईक को फेक दो, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, अटक करा, अटक करा, गणेश नाईकांना अटक करा आणि गणेश नाईकांची दादागिरी नही चलेगी, नही चलेगी अशा घोषणाही या महिला आंदोलकांनी दिल्या.
बंदूक ठेवून घाबरवायचे
यावेळी पीडित महिलेने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 1993पासून मी गणेश नाईकांना ओळखते. आम्हाला एक 15 वर्षाचा मुलगा आहे. माझी फसवणूक झाली. मला खोटी आश्वासने दिली. 2017नंतर त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. तू काय करू शकतेस? तुझी काय हिंमत आहे? तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? असं ते मला म्हणायचे. मला धमक्या दिल्या गेल्या. मला न्याय हवा आहे. मी लखानी सनकॉस्टमध्ये गेले होते. तेव्हा डिनर करत असताना आम्हाला सेक्युरिटी द्या. आमच्या मुलाला नाव द्या, असं मी त्यांना म्हटलं. तेव्हा ते बंदूक ठेवायचे आणि आम्हाला घाबरवत होते. त्यामुळे मी शांत होते, असं या पीडित महिलेने सांगितलं.
गेल्या 27 वर्षापासून मी त्रास भोगला. आता मला न्याय हवा आहे. आपल्या मुलाचे वडील घरी येतात, आपल्याबरोबर जेवतात, वेळ घालवतात. पण नाव द्यायला तयार नाहीत. त्यांचा स्वभाव खूप अग्रेसिव्ह होता. एकवेळा त्यांनी मला मारलंही आहे, असं ही या महिलेने सांगितलं.
नाईकांना अटक करून अहवाल सादर करा
एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर झालेल्या अपत्याचा स्विकार न करणारे भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गुन्हे दोन्ही पोलीस ठाण्यात दाखल झाले असून ते गंभीर आहेत. त्यामुळे नाईकांना अटक करून पुढील कारवाई करा. त्याचा अहवाल सादर करा, असं निर्देश पोलिसांना दिल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
संबंधित बातम्या:
Ganesh Naik: भाजप आमदार गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा, नेरुळ पोलिसांकडून गुन्हा दाखल