झुकेंगा नहीं साला! तीन वर्ष दाढी-कटींग न करणारा हा पठ्ठ्या कोणत्या पक्षाचा?
अजोती ग्रामपंचायतीवर जोपर्यंत आपला उमेदवाराचा विजय होत नाही तोपर्यंत दाढी-कटींग करणार नाही, असा निर्धार अमरजीत पवार यांनी तीन वर्षांपासून केला होता.
सोलापूर : राज्यातील तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज समोर येतोय. ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावागावातील निवडणूक, अगदी भावकीतील निवडणूक. या निवडणुकीला अनेक ठिकाणी घरातीलच माणसं एकमेकांच्या विरोधात उभं राहतात. गावातील सरपंचपदी आपला माणूस यावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. याशिवाय गावच्या सरपंचपदी आपला हक्काचा माणूस निवडून आला की गावात आपलीपण कॉलर ताठ असते, अशी अनेकांच्या मनातली भावना असते.
आपला माणूस सरपंच आहे म्हणून गावात मिरवता येतं. याशिवाय त्याचे अनेक फायदेही असतात. अर्थात ते सर्व फायदे इथे सांगणं शक्य होणार नाही. त्यामुळे प्रत्येक गाव-खेड्यातले लोकं या निवडणुकीला जास्त महत्त्व देतात. ग्रामपंचायत निवडणुकीला प्रतिष्ठा मानणाऱ्या अशाच एका पठ्ठ्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यात एकूण दहा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. यापैकी अजोती ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचा विजय झालाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे.
विशेष म्हणजे अजोती ग्रामपंचायतीवर जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचा विजय होत नाही तोपर्यंत दाढी-कटींग करणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अमरजीत पवार यांनी केला होता.
अमरजीत यांच्या प्रयत्नांना यश
अमरजीत पवार यांनी खरोखर तब्बल तीन वर्ष दाढी-कटींग केली नाही. त्यांनी गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता यावी यासाठी प्रयत्न केले. अखेर त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले.
अमरजीत यांच्या भावजयीचा विजय
अजोती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अमरजीत पवार यांच्या भावजयी विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत त्या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचा निकाल समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अमरजीत यांना खांद्यावर धरुन जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी अमरजीत यांनी ‘पुष्पा’ स्टाईलने हावभाव करत आपला पण आपण पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं.
‘…श्री तिरुपती बालाची यांच्या चरणी अर्पण करणार’
“माझं एक पण होतं की मला सर्व नागरिकांनी निवडून दिल्यानंतर मी माझे केसं व दाढी श्री तिरुपती बालाची यांच्या चरणी अर्पण करेन. तो पण आज सर्व ग्रामस्थांनी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून तो पण पूर्ण केलाय”, अशी भावना अमरजीत पवार यांनी व्यक्त केली.
“नागरिकांना रस्ते, पिण्याचं पाणी आणि गटार लाईनच्या नियोजनाचं वचन दिलंय. ते वचन पूर्ण करेन”, अशी प्रतिक्रिया अमरजीत पवार यांनी दिली.