खासदार सुप्रिया सुळे नितिन गडकरी यांच्याविषयी काय म्हणतायत, जरा नीट ऐका
भारतीय जनता पक्षाचे नेते विशेषतः महाराष्ट्रातील नेते खूप खोटं बोलतात. त्यांना यासंदर्भात पुरस्कार द्यायला हवा. कोणते धार्मिक पुस्तक त्यांना हे शिकवते, मला माहीत नाही.
परभणी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कामाच्या प्रेमात अनेक जण पडतात. त्यांच्या कामांचे कौतूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ऑफ दे रेकॉर्ड त्यांच्या कामांची स्तुती विरोधक नेहमी करतात. परंतु आता रेकॉर्डवर विरोधकांकडून नितीन गडकरी यांच्या कामांचे कौतूक केले गेले आहे. संपुर्ण केंद्रीय मंत्रिमंडळात सरकारमध्ये काम करणारे नितीन गडकरी एकमेव मंत्री आहेत आणि ते मी रेकॉर्डवर मान्य करते, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटलंय. परभणी जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाचे नेते विशेषतः महाराष्ट्रातील नेते खूप खोटं बोलतात. त्यांना यासंदर्भात पुरस्कार द्यायला हवा. कोणते धार्मिक पुस्तक त्यांना हे शिकवते, मला माहीत नाही. परंतु त्याचे उत्तर त्यांना कधीतरी द्यावेच लागेल. भाजपमधील नितीन गडकरी हे एकमेव मंत्री आहे, जे काम करताना पक्षाचा विचार करत नाही.
गडकरींचे विक्रम
नितीन गडकरी मोदी सरकारमध्ये दुसऱ्यांदा भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहे. ही जबाबदारी सांभाळताना त्यांनी देशात अनेक ठिकाणी महामार्गांचे जाळे उभे केले. नुकतेच दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे उद्घाटन झाले.
दिल्ली, राजस्थानसह देशातील पाच राज्यांमधून जाणारा हा एक्स्प्रेस वे देशातील सर्वात लांब महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी 1,386 किमी आहे. गडकरींनी सांगितले की, या एक्स्प्रेस वेच्या बांधकामासाठी 25 लाख टन कोळशाचा वापर केला जाणार आहे. याशिवाय चार हजार प्रशिक्षित अभियंते या एक्स्प्रेस वेच्या बांधकामात गुंतले होते.
24 तासांत 2.5 किलोमीटर काम या महामार्गाचे होत असल्याचा दावा नितिन गडकरी यांनी केला आहे. हा एक जागतिक विक्रम आहे. 50 किमीच्या सिंगल लेनमध्ये 100 तासांत जास्तीत जास्त कोळसा टाकण्याचा विश्वविक्रमही नोंदवला गेला आहे. नितीन गडकरी यांनी #BuildingTheNation असा हॅशटॅग देत ही माहिती टि्वट केलीय.
मागील आठवड्यात धमकी
नितीन गडकरी यांना कर्नाटकच्या बेळगावमधून काही दिवसांपुर्वी फोन आला होता. त्यानंतर अनेक विरोधकांनी त्यांची चौकशी केली.याप्रकरणानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. नागपूर पोलिसांनी बेळगाव पोलिसांची मदत घेतली. बेळगावच्या आयुक्तांशी बोलून फोन स्ट्रेस करण्यात आला. त्यानंतर असं लक्षात आलं की, एक व्यक्ती बेळगाव येथील कारागृहामध्ये आहे. त्याने धमकीचा फोन केला आहे.