‘रामदास आठवले हे राजकीय मौसमी शास्त्रज्ञ, सत्ता कुणाचीही असो, रामदास आठवले यांचे स्थान पक्के’, नितीन गडकरी यांचं वक्तव्य
"केंद्रात यापूर्वी ते मंत्री होते आणि आता तिसऱ्यांदा ते मंत्री आहेत. आता पुढे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमचे सरकार येऊन त्यांना मंत्री होण्याची गॅरंटी आहे. मात्र आम्हाला मात्र नाही आहे. गंमतीने मी नेहमीच म्हणत असतो राज्य कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे स्थान पक्के आहे", असं नितीन गडकरी म्हणाले.
रामदास आठवले यांनी मनोगतामध्ये आतापर्यंत तीनवेळा मंत्रीपद मिळाले आणि चौथ्यांदा आमचे सरकार आल्यावर मंत्री होणारच असल्याचे वक्तव्य केले. त्यावर गडकरी यांनी भूमिका मांडली. “रामदास आठवले यांनी दलित पॅंथर संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे काम केले. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमांतून त्यांनी महाराष्ट्रात रिपब्लकिन चळवळ शक्तीशाली बनविण्याचे काम केले. केंद्रात यापूर्वी ते मंत्री होते आणि आता तिसऱ्यांदा ते मंत्री आहेत. आता पुढे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमचे सरकार येऊन त्यांना मंत्री होण्याची गॅरंटी आहे. मात्र आम्हाला मात्र नाही आहे. गंमतीने मी नेहमीच म्हणत असतो राज्य कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे स्थान पक्के आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.
“गेल्या मंत्रीमंडळात आठवले केंद्रात मंत्री असताना त्यावेळी लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान यांना म्हणाले होते की, रामदास आठवले हे राजकीय मौसमी शास्त्रज्ञ आहेत. राजकारणात पुढे काय होणार आहे याची सर्व माहिती आठवले यांना असते”, असा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला. मारवाडी फाऊंडेशनर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
रामदास आठवले यांची मराठा आरक्षणाबाबतचं मोठं वक्तव्य
दरम्यान, रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आक्षणावर भूमिका मांडली. रामदास आठवले यांनी मराठा समाजासाठी ओबीसीमध्ये स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्याची मागणी केली आहे. आठवले यांच्या मते, जरांगे यांची मागणी रास्त आहे. पण राज्याला हा अधिकार नाही. त्यामुळे मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग तयार करता येईल का? यावर विचार व्हायला हवा. सोबतच त्यांनी विधानसभेसाठी 10 ते 12 जागा द्यावी, अशी मागणी केली आहे.
“चंद्रपूरची जागा ही अपक्ष आमदाराच्या ताब्यात असल्याने चंद्रपूरची जागा आरपीआय आठवले गटाला देण्यात यावी, अशी मागणी आम्ही महायुतीकडे करणार आहोत”, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आयोजित संविधान सन्मान महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी रामदास आठवले आज चंद्रपुरात आले होते.