आठ दिवसांत कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका
nashik onion prices | आठवड्यांपूर्वी 80 ते 100 रुपयांवर पर्यंत गेलेल्या कांद्याच्या दरात घसरण होत आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल 1250 रुपयांनी कांद्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कांद्याला चांगला दर मिळाल्यामुळे दिवाळी गोड होण्याची त्यांची अपेक्षा होती.
उमेश पारीक, लासलगाव, नाशिक | 4 नोव्हेंबर 2023 : कांद्याच्या दरात गेल्या आठ दिवसांपासून रोज घसरण होत आहे. गेल्या आठवड्यात 27 ऑक्टोबर रोजी उन्हाळी कांद्याला सर्वोच्च दर मिळाला होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार 820 रुपये दर मिळाला होता. त्या दिवशी कांद्याचा सरासरी दर 4 हजार 900 रुपये इतका होता. बाजारात कांद्याचे दर 80 ते 100 रुपये गेले होते. यामुळे सरकारने कांदा दर नियंत्रण करण्यासाठी नाफेडचे कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आणि आठवड्याभरात कांद्याच्या दरात तब्बल 1250 रुपयांची घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
काय घेतला केंद्र सरकारने निर्णय
राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहे. यामुळे केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉक विक्रीसाठी बाजारात आणला. हा कांदा पंचवीस रुपये किलो दराने विक्रीसाठी आणला गेला. सुमारे दोन लाख मॅट्रिक टन कांद्याचे वाटप सुरू झाले. यामुळे आठवड्यापासून कांद्याच्या दरामध्ये दररोज घसरण होत आहे. कांद्याचे पाच हजार रुपयांच्या जवळपास गेलेले दर 3700 रुपयांपर्यंत खाली आले आहे. नाशिकमधील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 1250 रुपयांची घसरण झाली आहे.
शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा
आशिया खंडात लासलगाव कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात दररोज घसरण आहे. शनिवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याची 777 वाहनातून 10 हजार क्विंटल आवक झाली. त्याला जास्तीत जास्त 4 हजार 246 रुपये दर मिळाला. कमीतकमी दर 1 हजार 400 रुपये होता. सरासरी 3 हजार 650 रुपये प्रतिक्विंटल दर कांद्याला मिळाला. यामुळे केंद्र सरकारने स्वस्तात कांदा विक्रीचा प्रयोग न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. कांद्याचे निर्यात शुल्क 800 डॉलर प्रति टन केले. यामुळेही कांदा विदेशात जाण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे देशातंर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर घसरले आहे.