नाशिकमध्ये परवानगीविनाच भिर्रर्र…आयोजक सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार, कोरोनाचे नियम पायदळी
ओझरच्या बैलगाडा शर्यतीत शासनाच्या कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. यावेळी हजारो लोकांची उपस्थिती होती. बहुतांश जणांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. विशेष म्हणजे या शर्यतीला प्रशासनाची परवानगी नसल्याचे समोर आले आहे.
नाशिकः सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठल्यानंतर आज शनिवारी नाशिकमधल्या ओझरमध्ये राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत रंगली. मात्र, स्पर्धेसाठी परवानगी दिली नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. त्यामुळे आयोजक अडचणीत आले आहेत.
माजी आमदार आयोजक
राज्यभरातून शेकडो शेतकरी आपल्या सर्जा-राजाला घेऊन शर्यतीत सहभागी होण्यासाठी आले, तर हजारो प्रेक्षकांनी शर्यत बघायला गर्दी केली. सकाळपासूनच ओझरमध्ये शेतकऱ्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती. दुपानंतर सगळीकडे एकच कल्लोळ पाहायला मिळाला. येणाऱ्या काळात राज्यातही इतर अनेक ठिकाणी अशा स्पर्धा रंगणार आहेत. बैलाचा समावेश पाळीव प्राण्यामध्ये केला जातो. पाळीव प्राण्यांना शर्यत किंवा प्रदर्शनात बंदी आहे. त्यामुळे आतापर्यंत बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली. त्यानंतर आज शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी ओझरमध्ये महाराष्ट्रातल्या पहिल्याच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.
21 हजारांचे बक्षीस
सर्वोच्च न्यायालायने घातलेल्या सर्व निर्बंधांचे आणि सूचनांचे पालन करत ही शर्यत आयोजित केली असल्याची माहिती आयोजक आणि माजी आमदार अनिल कदम यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. स्पर्धेतील विजेत्या बैलजोडीला 21 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. मात्र, दुसरीकडे या स्पर्धेला पोलीस आणि प्रशासनाने कसलिही परवानगी दिली नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या शर्यतीला परवानगी नसल्याचे म्हटले आहे. एकीकडे राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवे नियम जारी केले आहेत. त्यानंतर ही शर्यत झाली. त्यासाठी राज्यभरातून हजारो शेतकरी या ठिकाणी जमले. त्यामुळे याप्रकरणी आयोजकांवर प्रशासन कारवाई करू शकते.
नियम मात्र धाब्यावर
बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागात बैलाच्या मालकांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते. त्यामुळे शर्यतीत भाग घेण्यासाठी बैलांना प्रशिक्षण दिले जाते. बघ्यांसाठी पर्वणी असलेल्या बैलगाडा शर्यतींसाठी बैलांची वर्षभर खास काळजी घेतली जात असे. चंद्रपुरात जागेअभावी प्रत्येक बैलगाडा वेगवेगळी धावत असे आणि त्यांची वेळ मोजून निकाल लावला जात असे. मात्र, आज नाशिकमध्ये रंगलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी खास मोकळ्या रानात जमीन भुसभुसीत करून ट्रॅक केलेले दिसले. ही शर्यत पाहायला मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे शासनाच्या नव्या कोरोना नियमांचे इथे उल्लंघन झालेले दिसले. नव्या नियमानुसार खुल्या जागेतील कार्यक्रमाला फक्त 250 जणांच्या उपस्थितीला परवानगी आहे. मात्र, इथे सारेच नियम धाब्यावर बसण्यात आले होते. विशेष म्हणजे बहुतांश जणांचा तोंडावर मास्क नव्हते.
इतर बातम्याः
भय इथले संपत नाही…कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिकमध्ये नवे नियम, जाणून घ्या माहिती!