आयुष्यातला सर्वात वाईट काळ, ते भयानक संकट, अखेर अल्पवयीन नराधमाच्या मुसक्या आवळल्या, गौतमी पाटील हिची पहिली प्रतिक्रिया काय?
गौतमी पाटील हिच्यावर काही दिवसांपूर्वी खूप मोठं संकट कोसळलं होतं. त्या संकटातून ती आता बाहेर पडली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी तिला चांगली साथ दिलीय. पोलिसांनी तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांपैकी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अहमदनगर : डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या नरधामांपैकी एका अल्पवयीन मुलाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी आज दुपारी समोर आली. पुणे पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरु आहे. अल्पवयीन मुलाची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी आणखी दोघा-तिघांना अटक होण्याची शक्यता आहे. कारण स्वत: गौतमीने ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबत प्रतिक्रिया देताना माहिती दिली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईवर गौतमीने आपली भूमिका मांडली.
गौतमी पाटीलचा अहमदनगर येथे लहुजी समाजसेवा मंडळाकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमावेळी गौतमी पाटीलने ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “छान वाटतंय, अनाथ मुलांसाठी आपला कार्यक्रम ठेवलाय. आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आम्ही करु. पण अनाथ मुलांसाठी सर्वांनी मदत करा, असं आवाहन मी करते. लहुजी समाजसेवा मंडळाला बांधकामासाठी मदत हवी आहे. सर्वांनी कृपया त्यांना मदत करा”, असं गौतमी पाटील म्हणाली.
गौतमी पाटीलला यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने समाधान व्यक्त केलं. “व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी ज्याला अटक केलीय तो खूप लहान मुलगा आहे. त्याचं वय 17 वर्षे इतकं आहे. त्या मुलाने व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी आज त्या मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी मला खूप मदत केली. मी याबद्दल पुणे पोलिसांचा आभार मानते. पोलिसांनी एकाला पडकलं आहे. अजून दोघं-तिघं आहेत. पोलीस त्यांनाही पकडतील. बरं वाटलं की आज कुणीतरी एकजण सापडलंय”, अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने दिली.
रघुवीर खेडकर यांच्या आरोपांना उत्तर
ज्येष्ठ तमासा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमी पाटीलच्या मानधनाविषयी गंभीर आरोप केले होते. या आरोपांवरही गौतमी पाटीलने भूमिका मांडली. “माझी फी मोठ्या प्रमाणात नसते. माझं एकच म्हणणं आहे की मी कोणाकडे 5 लाख रुपये घेतले त्याला समोर आणा. त्या कार्यकर्त्याला, अयोजकाला माझ्यासमोर आणा. असं काही नाहीय. माझ्याबद्दल असा काहीही गैरसमज पसरवू नका. माझी एवढी फी नाहीय. माझा लावणीचा कार्यक्रम नाही तर डिजे शो आहे”, असं उत्तर गौतमी पाटीलने दिलं.
दरम्यान, गौतमी पाटील हिच्यावर वारंवार आक्षेपार्हतेचा ठपका ठेवून टीका केली जाते. त्याच मुद्द्यावर गौतमीने याआधीच भूमिका मांडलीय. “झालेल्या गोष्टींवर अनेकदा माफी मागितली. एकदा, दोनदा नव्हे तीनदा माफी मागितली. समोरच्या व्यक्तीला आता समजलं पाहिजे, हिने माफी मागितली आहे. माफी तरी कितीदा मागायची? आता यापुढे मी कोणाचं ऐकून घेणार नाही”, असं गौतमी पाटील म्हणाली. “मला अजून बरेच जण म्हणतात हीचं अश्लील नृत्य असतं. महिलांसमोर मी डान्स केला. हा डान्स अश्लील होता का? हे तुम्हीच सांगा मी तर सांगून सांगून थकले आहे”, असंही ती म्हणाली आहे.