ठाकरे गटाला आणखी एक धक्का, आमदाराला एसीबीची नोटीस; मालमत्तेची चौकशी होणार
हो मी श्रीमंत आहे. माझी श्रीमंती ही बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीवर मारलेली थाप आहे. माझे शिवसैनिक ही माझी संपत्ती आणि श्रीमंती आहे.
रत्नागिरी: ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने नोटीस बजावली आहे. साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. साळवी यांना 5 डिसेंबरपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आधी साळवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या वावड्या उठल्या होत्या. पण साळवी यांनी कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचं जाहीर केलं होतं. या चर्चांना पूर्णविराम मिळताच साळवी यांना नोटीस आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राजन साळवी यांनी नोटीस आल्यानंतर सकाळीच पत्रकार परिषद घेऊन थेट राज्यकर्त्यांनाच ललकारले आहे. मला चौकशीची नोटीस आली आहे. मी चौकशीला सामोरे जाणार आहे. मी निर्दोष आहे. मी स्वच्छ आहे. माझ्या जनतेलाही हे माहीत आहे. अशा धमक्यांना भीक घालत नाही, असं राजन साळवी म्हणाले.
हिंमत असेल तर मला तुरुंगात टाका. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. हिंमत असेल तर मला अटक करा. मी घाबरत नाही. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. लोक माझ्या पाठी आहेत. उद्धव ठाकरे आणि शिवसेना माझ्या पाठी आहे. जेलमध्ये जाईन, पण मी शरण जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
अनेक वर्षापासून मी राजकारणात आहे. संपूर्ण देशात, महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ज्यांची बेहिशोबी मालमत्ता आहे, असे लोकं भाजपमध्ये गेल्यावर ताबडतोब स्वच्छ होतात. निर्दोष होतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. आता मला नोटीस मला मिळाली. माझ्या संपत्तीची, मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश हळूहळू निघताली, असंही ते म्हणाले.
हो मी श्रीमंत आहे. माझी श्रीमंती ही बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीवर मारलेली थाप आहे. माझे शिवसैनिक ही माझी संपत्ती आणि श्रीमंती आहे. वडापाव खाऊन आम्ही जिल्ह्यातील शिवसेना वाढवली ही चूक केली का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
मला नोटीस मिळाल्याचं दुख आहे. तुम्हलाा तुरुंगात टाकू अशा धमक्या मला काही लोकांकडून मिळाल्या आहेत. तुरुंग मला काही नवीन नाही. जनतेच्या हितासाठी लोकांच्या प्रश्नांसाठी मी अनेकदा तुरुंगात गेलो. त्यामुळे मला कुणी धमकी देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.