VIDEO: आधी औरंगाबाद आणि आता सोलापूर, मुस्लिम आरक्षण हाच ओवेसींचा निवडणूक अजेंडा?
एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आघाडी सरकारला धारेवर धरले. आम्ही तुम्हाला शिक्षणात आरक्षण मागितलं आहे.
सोलापूर: एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आघाडी सरकारला धारेवर धरले. आम्ही तुम्हाला शिक्षणात आरक्षण मागितलं आहे. आम्हाला आरक्षण का देत नाही. तुमची तोंडं बंद का आहेत? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. राज्यात महापालिका निडवणुका होऊ घातल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर ओवेसी यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा लावून धरल्याने मुस्लिम आरक्षण हा ओवेसींचा निवडणूक अजेंडा आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आज सोलापुरात सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडतानाच राज्यातील आघाडी सरकारलाही त्यांनी धारेवर धरलं. मुस्लिमांच्या आरक्षणाची गरज काय असे काही लोक बोलत आहेत. आम्ही शिक्षणात आरक्षण मागितलं. तुम्ही दिलं नाही. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तोंडं बंद का आहेत? असा सवाल करतानाच किती जणांकडे खिशात पेन आहे. (समोर बसलेल्यांना प्रश्न) खिशात पेन ठेवायला शिका. तुम्हाला कलम जिवंत ठेवेल. तलवार नाही, असं ओवेसी म्हणाले.
11 डिसेंबरला मुंबईत धडकणार
यावेळी त्यांनी मुस्लिमांचे शिक्षणातील प्रमाणही सांगितलं. सेक्युलॅरिझमचे गुलाम झाला. अजून कधीपर्यंत तुम्ही गुलाम राहणार आहात. यांनी कायम तुमच्यावर पाठिमागून वार केले आहेत, असंही ते म्हणाले. येत्या 11 डिसेंबर रोजी मुंबईत आरक्षणासाठी आणि वक्फच्या जमिनी वाचवण्यासाठी जाणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
बी टीम म्हणून हिणवलं आणि सत्तेसाठी एकत्र आले
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एमआयएमला मत न देण्याचं आवाहन केलं होतं. आम्हाला मत न देण्याचं आवाहन करणं म्हणजे भाजपला मतदान करण्यासारखं आहे. शिवसेना-भाजपला फायदा होईल म्हणून आम्हाला मतदान न करण्याचं आवाहन करण्यात आलं. त्याचा परिणाम देखील झाला. सोलापुरात काहींनी त्याला खरं समजलं होतं, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम म्हणून हिणवलं. जेव्हा सत्ता स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा हेच लोकं एकत्रं आले. आपण सगळे एक आहोत, असं म्हणत हे लोक एकत्रं आले, असा हल्लाही त्यांनी चढवला.
वधू कोण हे पवारच सांगतील
शिवसेना हा काही सेक्युलर पक्ष नाही. ते भाजपसारखे जातीयवादी आहेत. शरद पवारांनी सांगावं शिवसेना सेक्युलर आहे का? तुम्ही विसरलात 1992मध्ये काय झालं? केवळ तुमचं कुटुंब वाचवण्यासाठी तुम्ही शिवसेनेसोबत गेलात. अजित पवार हे 48 तासाचे नवरदेव देखील झाले होते. फडणवीस-पवारांनी ल्गन केलं. आता वधू कोण माहीत नाही. शरद पवारच सांगतील. फाईल्स गायब होतात आणि नंतर पुन्हा हे लोक सेक्युलर होतात, असा हल्लाही त्यांनी चढवला.
संबंधित बातम्या:
Muslim Reservation : ‘एमआयएम’चा 11 डिसेंबरला एल्गार, मुस्लिम आरक्षणासाठी ‘चलो मुंबई’चा नारा