नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य, बाळासाहेब थोरात यांची थेट हायकमांडकडे तक्रार?; इशारा काय दिला?
काँग्रेसने तांबे यांना पक्षातून निलंबित केलं होतं. असं असतानाही बाळासाहेब थोरात यांनी एका कार्यक्रमात सत्यजित तांबे यांचं अभिनंदन केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नगर: काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच थेट आरोप केले आहेत. तांबे यांनी एबी फॉर्म वाटपाच्या घोळावरून नाना पटोले यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे अडचणीत सापडले आहेत. सत्यजित तांबे यांचा हा हल्ला ताजा असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पटोले यांना घेरलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी थेट हायकमांडकडे पटोले यांची तक्रार केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य असल्याचं थोरात यांनी हायकमांडला कळवल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे पटोले प्रचंड अडचणीत सापडल्याची चिन्हे दिसत आहेत.
बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांड यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी थेट नाना पटोले यांची तक्रार केली आहे. नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य झालंय, असं सांगतानाच असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील, असा इशाराही बाळासाहेब थोरात यांनी पत्रातून दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं सांगितलं जात आहे.
सत्यजित तांबे यांचं अभिनंदन
सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षातून बंडखोरी केली होती. त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील उभ्या होत्या. पाटील यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी झाले.
काँग्रेसने तांबे यांना पक्षातून निलंबित केलं होतं. असं असतानाही बाळासाहेब थोरात यांनी एका कार्यक्रमात सत्यजित तांबे यांचं अभिनंदन केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ज्या व्यक्तीला पक्षातून निलंबित करण्यात आलं त्याचं थोरात यांनी अभिनंदन केलंच कसं? असा सवाल केला जात आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर शिंदेशाही बाणा या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल होत. यावेळी सत्यजित तांबे, डॉ. सुधीर तांबे, थोरातांच्या कन्या जयश्री थोरात, सत्यजित यांच्या पत्नी मैथिली तांबे, आई दुर्गा तांबे, काँग्रेसचे आमदार लहू कानडे उपस्थित होते. यावेळी थोरात यांनी सत्यजित तांबे यांचं अभिनंदन केलं.
खूप राजकारण झालं
विधान परिषद निवडणुकीत खूप राजकारण झालं. सत्यजित खूप चांगल्या मताने विजय झाला त्याचे अभिनंदन. जे राजकारण झालं ते मला व्यथित करणारं आहे. मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्यात.हे पक्षीय राजकारण आहे. बाहेर बोलू नये या मताचा मी आहे. या बाबतीत राज्य पातळीवर, पक्ष पातळीवर आम्ही योग्य निर्णय करू. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे, असं थोरात म्हणाले.
काँग्रेसच्याच विचाराने वाटचाल
मधल्या काळात अशा बातम्या आल्या की आपल्याला पार भारतीय जनता पक्षापर्यंत नेऊन पोहचवलं होतं. एवढंच नाही तर भाजपच्या तिकिटाचे वाटप देखील करून टाकलं. काही लोक गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांनी अनेक प्रकारच्या चर्चा घडवून आणल्या. आतापर्यंत काँग्रेसच्या विचाराने वाटचाल केली. पुढील वाटचाल त्याच विचाराने राहाणार याची ग्वाही देतोय, असं ते म्हणाले.