शिवसेना नाही, आता आघाडीतील ‘या’ पक्षात होणार मोठा भूकंप; भाजपच्या खासदाराचा गौप्यस्फोट
प्रत्येकजण आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहे, हेच काँग्रेसचे पहिल्यापासूनचे दुर्देव आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी सत्ता भोगूनही पक्षाला काहीच योगदान दिलं नाही.
नगर: गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत पडझड सुरू आहे. अनेक नेते ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. ठाकरे गटातील पडझड सुरू असतानाच आता महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे. तसं भाकीतच नगरचे खासदार आणि भाजपचे नेते सुजय विखे-पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमधून कोणता नेता बाहेर पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खासदार सुजय विखेपाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना भूकंपाचे हे संकेत दिले आहेत. काँग्रेसमध्ये लवकरच भूकंप होणार आहे. काँग्रेसचे ठरावीक लोकच मलिदा खात आहेत. शिवसेनेच्या आमदारांमध्ये जशी धुसफूस होती, तशीच अस्वस्थता काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे.
त्यांचे स्वत:चे मंत्री देखील आमदारांची कामं करत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत तुम्ही पाहालच. भविष्यात काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल. राज्यातील जनताही पाहिल. ही तर सुरुवात असेल, असं सुजय विखे पाटील म्हणाले.
प्रत्येकजण आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहे, हेच काँग्रेसचे पहिल्यापासूनचे दुर्देव आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी सत्ता भोगूनही पक्षाला काहीच योगदान दिलं नाही. फक्त स्वत:चे घर आणि प्रपंच वाढवला. नव्या पिढीला वारंवार नाकारून त्यांना लांब केलं गेलं.
त्यामुळे अनेक युवक बाहेर पडले. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच शेवटचा तरुण राहणार आहे. तो म्हणजे राहुल गांधी. ज्येष्ठ नागरिकांचा पक्ष अशीच काँग्रेसची ओळख राहणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी विखे-पाटील यांनी सत्यजित तांबे यांच नाव न घेता सूचक वक्तव्य केलं. अनेक मित्रपरिवार सगळ्यात पक्षात असतात. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांवर मी काय मार्ग दाखवला हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र मी दाखवलेला मार्ग लोक अवलंबतील. ज्यांना मार्ग दाखवला आहे, त्याचे परिणाम आपल्याला हळूहळू दिसतील, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी राज्य काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याचं भाकीत वर्तवून काँग्रेसमध्ये खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसचे कोण नेते बाहेर पडणार?
कोणते आमदार बाहेर पडणार? ते कोणत्या पक्षात जाणार याविषयी सुजय विखे यांनी सस्पेन्स ठेवला आहे. त्यावर त्यांनी काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची डोकेदुखी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.