विधान परिषदेत भाजपचा पहिला विजय, महाविकास आघाडीला धक्का; ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिला निकाल आला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत.
रायगड: शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिला निकाल आला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना पराभूत केलं आहे. बाळाराम पाटील यांचा पराभव हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर, या विजयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात सरळ लढत होती. या निवडणुकीत बाळाराम म्हात्रे यांना 20800 मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 9500 मते मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 11,300 मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे. बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. तरीही पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.
फटाके फुटले, गुलाल उधळला
या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटप करत आनंदाला वाट मोकळी केली. काही कार्यकर्त्यांनी तर ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होताच त्यांना मिठी मारून जल्लोष केला.
सर्व शिक्षकांचा विजय
दुसरीकडे अत्यंत धक्कादायक पराभव झाल्याने शेकापच्या कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. बाळाराम पाटील हे पराभूत झाले. पण मोठ्या फरकाने ते पराभूत झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शेकापच्या साथीला ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असून सुद्धा हा पराभव झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, या पराभवावर बाळाराम पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी माझ्या सर्व शिक्षकांचा हा विजय असल्याचं म्हटलं आहे.