प्रसिद्ध उद्योगपती पारेख बंधूंच्या घरी ईडीची 12 तास झाडाझडती, छापेमारीचं सर्वात मोठं कारण आलं समोर…
मुंबई आणि पुण्यानंतर आता ईडीने सांगलीतही छापेमारी केली आहे. येथील प्रसिद्ध व्यावसायिक पारेख बंधू यांच्या निवासस्थानी ईडीने तब्बल 12 तास झाडाझडती केली.
सांगली : मुंबईसह पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ईडीने छापेमारी सुरू केली आहे. मुंबईतील कोव्हिड टेंडर घोटाळ्याप्रकरणी ईडीने छापेमारी केली आहे. मुंबई महापालिकेचे तीन माजी अधिकारी आणि दोन राजकीय नेत्यांच्या घरावर धाडी मारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एका अधिकाऱ्याच्या घरी तर 100 कोटींची संपत्ती सापडली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याने एवढ्या कमी वेळात एवढी मोठी संपत्ती जमवलीच कशी? असा सवाल केला जात आहे. ही छापेमारी सुरू असतानाच काल सांगलीतही ईडीने छापेमारी केली आहे. सांगलीतील छापेमारीचा मुंबईतीला कोव्हिड घोटाळ्याशी काहीच संबंध नाही. सांगलीत प्रसिद्ध उद्योगपती पारेख बंधूंच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.
सांगलीतील पारेख बंधूंच्या घरावर काल ईडीने धाड मारली. त्यामुळे सांगलीमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. दिनेश पारेख आणि सुरेश पारेख हे पारेख बंधू हे मोठे उद्योजक, कॉन्ट्रॅक्टर आणि मेडिकल क्षेत्रामधील नावाजलेलं प्रस्थ आहेत. पारेख बंधूंच्या घरावर ईडीने छापेमारी करण्यामागचं कारणही समोर आलं आहे. पारेख बंधू अनेकांना फायनान्स करत असल्याचेही कळते. त्यामुळेही पारेख बंधू यांच्या घरावर धाड मारण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच त्यांच्या व्यवसायात आर्थिक अनियमितता असल्यानेही ईडीने छापेमारी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
तपशील देण्यास नकार
ईडीच्या दोन पथकांनी काल सकाळीच पारेख बंधू यांच्या घरावर छापा टाकला. ईडीने पारेख बंधूंच्या घरातील कागदपत्रांची छाननी केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील गाड्यांचीही तपासणी केली. तब्बल 12 तासाहून अधिक काळ ही चौकशी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती. शिवाजी नगर येथील पारेख बंधूंच्या दोन बंगल्यावर ही धाड मारण्यात आली. तसेच बंगल्याबाहेर सीआरएफचे जवानही तैनात करण्यात आले होते. या धाडीनंतर चौकशीचा अधिक तपशील देण्यास ईडीने नकार दिला.
पोलीसही घटनास्थळी
ईडीच्या पथकाने अचानक छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पारेख बंधूंसारख्या बड्या प्रस्थांच्याा बंगल्यावर धाडी पडल्याचं ऐकल्यावर सांगलीत उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे धाड मारणारे अधिकारी ईडीचेच आहेत का? याची खातरजमा करण्यासाठी विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणला नाही.