कोशिश करने वालों की… गडचिरोलीच्या ‘लेडी टॅक्सीचालक’ तरुणीला इंग्लंडच्या विद्यापीठात प्रवेश; पण 27 लाख भरणार कुठून?
किरणला लीड्स विद्यापीठात प्रवेश मिळाला असला तरी तिच्या समोरील अडचणीचा डोंगर अजून संपलेलान नाही. या विद्यापीठात 27 लाख रुपये शुल्क भरायचे आहे. एवढी रक्कम भरायची कुठून?
गडचिरोली: गडचिरोली सारखा आदिवासी आणि नक्षली विभाग… घरी आठराविश्व दारिद्रय म्हणून तिने टॅक्सीचं स्टेअरिंग हातात घेतलं अन् टॅक्सी चालवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला सुरुवात केली. गडचिरोलीतील लेडी टॅक्सी चालक म्हणून ती फेमसही झाली. पण हे करताना शिक्षण मात्र सोडलं नाही. ती शिकत राहिली. परीक्षा देत राहिली अन् अखेर तिला सातासमुद्रापलिकडचे दरवाजे उघडे झाले. ही कहाणी आहे गडचिरोलीची लेडी टॅक्सीचालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरण रमेश कुर्मा हिची आणि तिच्या जिद्दीची. किरणला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या प्रसिद्ध ‘लीड्स’ विद्यापीठात प्रवेश मिळाला असून तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
किरण रमेश कुर्मा (वय 25) ही तरुणी सिरोंचा तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या रेगुंठा येथे राहते. तिने अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. ‘लेडी टॅक्सी चालक’ म्हणून ती गडचिरोलीत प्रसिद्ध आहे. वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून उदरनिर्वाहासाठी ती टॅक्सी चालवते. महिलांनी चार चाकी वाहन चालविणे हा आता कौतुकाचा विषय राहिलेला नाही.
अर्थशास्त्राची पदवी
पण अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन एखादी युवती नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात चक्क टॅक्सी चालवते तेव्हा ती कौतुकाचीच नाही तर आश्चर्याचा सुखद धक्का देणारी बाब ठरते. किरणच्या ध्यास आणि कष्टाचं सर्वत्र कौतुक याआधीच झालंय.
राज्याबाहेरही तिचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आलाय. हलाखीच्या परिस्थितीतही उच्च शिक्षण घेण्याच्या जिद्दीमुळे तिला आज विदेशात शिक्षण घ्यायची संधी चालून आली आहे.
अन् टॅक्सी चालक झाली
उच्च शिक्षण घेऊन काही तरी वेगळं करण्याची तिची जिद्द होती. त्यामुळेच किरणने हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठात प्रवेश घेतला होता. उस्मानिया विद्यापीठात तिने अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली. मात्र, पदवी घेतल्यानंतर नोकरीची अडचण उभी राहिली.
तिला शिकायचंही होतं. त्यासाठी वेळही हवा होता. पण घरची परिस्थितीही चांगली नव्हती. त्यामुळे तिने 2018मध्ये वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्याचा निर्णय घेतला. तिने टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातही केली.
आधी लोक घाबरायचे
गडचिरोली हा आदिवासी बहुल परिसर. नक्षली भाग. तरीही तिने कोणतीही भीती मनात न बाळगता टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. गंमत म्हणजे सुरुवातीच्या काळात किरणच्या टॅक्सीतून प्रवास करायला लोक घाबरायचे. एखादी मुलगी टॅक्सी चालवते हे ग्रामीण भागात पहिल्यांदाच घडत होतं.
त्यामुळे लोकांना भीतीही वाटत होती आणि कुतुहूलही वाटत होतं. मात्र, नंतर सरावाने त्यांची भीती मेली आणि लोकांनी टॅक्सीत बसणे सुरू केले. त्यामुळे किरणच्या धंद्यात बरकतही आली.
अन् टर्निंग पॉइंट मिळाला
टॅक्सी चालवून उत्पन्न बऱ्यापैकी होत होतं. पण किरणला उच्च शिक्षणाची दारे खुणावत होती. उच्च शिक्षण घेतलं पाहिजे असं तिला मनातून वाटत होतं. म्हणून तिने उच्च शिक्षणासाठी काय करावे लागेल याचा शोध घेण्यास सुरुवात केली. याच काळात बीड येथी एकलव्यच्या कार्यशाळेत राजू केंद्रे आणि विशाल ठाकरे यांच्याशी तिची ओळख झाली. या दोघांनीही तिला परदेशी शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले.
अन् धडपड थांबली.
या दोघांचे मार्गदर्शन मिळाल्याने किरणने विदेशातील काही विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न चालू केले. सप्टेंबर 2022 मध्ये तिने इतर विद्यापीठांच्या प्रवेशपूर्व परीक्षा दिल्या. यात तिला यश मिळाले. जगात 86 वे मानांकन असलेल्या इंग्लंडमधील ‘लीड्स’ विद्यापीठात एमएससी ‘मार्केटिंग मॅनेजमेंट’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. अन् तिची धडपड थांबली.
27 लाख भरणार कुठून?
किरणला लीड्स विद्यापीठात प्रवेश मिळाला असला तरी तिच्या समोरील अडचणीचा डोंगर अजून संपलेलान नाही. या विद्यापीठात 27 लाख रुपये शुल्क भरायचे आहे. एवढी रक्कम भरायची कुठून? असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला आहे. राज्य सरकार किंवा एखाद्या संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळतेय का? याचा आता तिचा शोध सुरू आहे.