Income Tax Raids : सोलापूरपाठोपाठ कोल्हापूरसह राज्यात आयकर विभागाच्या धाडी, साखर कारखान्यांसाठी कडू दिवस?
Income Tax Raids :सोलापूरातील प्रसिद्ध व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शन या ठिकाणी काल सकाळी छापे पडले. आयकर विभागाच्या पुणे येथील पथकाच्या माध्यमातून मेहूल कन्स्ट्रक्शनच्या कागदपत्रांची तपासणी अधिकारी करत आहेत.
पंढरपूर: सोलापूरसह (solapur) पंढरपुरात आयकर विभागाची छापेमारी (Income Tax Raids) सुरू असतानाच आजही आयकर विभागाने कोल्हापुरात (kolhapur) जोरदार धाडी मारल्या. शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड-चिंचवाड रोडवरील भागवत चौगुले- कर्नाळे यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे. याप्रकरणी भागवत चौगुले-कर्नाळे यांची गेल्या 24 तासाहून अधिक काळ चौकशी सुरू आहे. पंढरपूर धाराशिव कारखान्याचे भागीदार असल्याने ही छापेमारी सुरू आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास ही धाड पडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारीमुळे इतरांचेही धाबे दणाणले आहेत. या छापेमारीत आयकर विभागाच्या हाती काय लागले याचा खुलासा होऊ शकलेला नाही. तसेच ही छापेमारी कधीपर्यंत सुरू होईल हेही सांगता येत नाही.
दरम्यान, कालसोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजल्यापासून आयकर विभागाचे धाडसत्र सुरू झालं होतं. अजूनही या ठिकाणची छापेमारी सुरू आहे. शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक, रुग्णालयांची आयकर विभागाच्यावतीने चौकशी सुरु आहे. तर पंढरपूर येथील खासगी साखर कारखान्याचे चालक अभिजीत पाटील यांच्या विविध कारखाने आणि उद्योगावर या धाडी टाकण्यात आल्यात. सकाळी 7 वाजल्यापासून शहरात जवळपास 7 ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
रुग्णालयांवरही धाडी
सोलापूरातील प्रसिद्ध व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शन या ठिकाणी काल सकाळी छापे पडले. आयकर विभागाच्या पुणे येथील पथकाच्या माध्यमातून मेहूल कन्स्ट्रक्शनच्या कागदपत्रांची तपासणी अधिकारी करत आहेत. सोबतच बिपीनभाई पटेल संचालक असलेल्या सोलापूर शहरातील आश्विनी हॉस्पिटल आणि कुंभारी परिसरात असलेल्या आश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी देखील आयकर विभागाचे पथक दाखल झाले होते.
पटेल यांच्याशी संबंधित कार्यालयांची चौकशी सुरू
सोलापुरातील आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी बिपिनभाई पटेल यांच्या घरी ठाण मांडून बसले आहेत. सकाळपासून पटेल यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व कार्यालयांची चौकशी सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रुग्णालयांमध्ये आयकर विभागाच्या धाडी
सोलापुरातील दोन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांच्या रुग्णालयात देखील काल सकाळी आयकर विभागाचे अधिकारी दाखल झालेत. सोलापुरातील सात रस्ता परिसरात असलेल्या डॉ. गुरुनाथ परळे यांच्या स्पंदन हार्ट क्लिनिक याठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी तपासणी करत आहेत. तसेच सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ अनुपम शहा यांच्या हॉस्पिटलवर देखील आयकर विभागाने छापा टाकलाय.
सोलापूर शहरात ‘या’ ठिकाणी छापेमारी
1) मेहुल कन्स्ट्रक्शन 2) अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर 3) अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी 4) बिपीन पटेल यांच्या घरी 5) डॉ. गुरुनाथ परळे यांचे स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल 6) डॉ. अनुपम शाह यांचे हार्ट क्लिनिक 7) डॉ. विजयकुमार रघोजी यांचे रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल