“बुथ कमिट्या तयार करा, अडचण आलीच तर फोन करा,” 2024 च्या निवडणुकीसाठी जयंत पाटलांनी कंबर कसली
आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
अहमदनगर : आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना 2024 च्या निवडणुकीसाठी बुथ कमिट्या तयार करा असे सांगितले आहे. आज (1 ऑक्टोबर) अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर आणि रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी बोलताना त्यांनी दोन्ही मतदारसंघात वेगळे चित्र पाहायला मिळेल असा दावा केला. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना वरील आदेश दिले.
जिद्दीने लढा, अडचण आली तर मला फोन करा
यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. “सर्वात जास्त जनाधार लाभलेले नेतृत्व राष्ट्रवादीत असून शरद पवार यांच्या रुपाने सर्वात अनुभवी नेत्याचं आपल्याला मार्गदर्शन लाभत आहे. माझ्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही. जिद्दीने लढा, अडचण आली तर मला फोन करा. फोन नाही उचलला तर मेसेज करा. पण उत्तर नक्कीच मिळेल,” असे जयंत पाटील म्हणाले. यावेळी अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्राविरोधात रस्त्यावर उतरा
तसेच पुढे बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. भुजबळसाहेबांसारखे नेतृत्व जपण्याचे काम आपण केले आहे. आपले फक्त 54 आमदार आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे यापेक्षा जास्त निवडून आणण्यासाठी केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे. भुजबळसाहेब अफाट काम करत आहेत. त्यांच्या विभागाची शिवभोजन थाळी योजना देशभर गाजत आहे. हे काम आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायला हवं. हे कधी शक्य होईल जेव्हा आपले संघटन मजबूत असेल, असेही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं.
या कार्यक्रमानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली. फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत. ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं?, असं पाटील मिश्कीलपणे म्हणाले.
इतर बातम्या :
परमबीर सिंग नेमके गेले कुठे? विदेशात पळून गेले? ठाणे पोलीसांची लूक आऊट नोटीस जारी
पंकजा मुंडेंना फोन करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी आधी वाचा, ‘अनवेल’चं ट्विट
पीएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्यात 1 हजार कोटींचा घोटाळा; आशिष शेलारांचा नवा बॉम्ब
Video : Mumbai विमानतळ येथून 5 किलो ड्रग्जची चादर जप्त, एनसीबीच्या पथकाची कारवाई
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv#Mumbai pic.twitter.com/3Zieit9gtJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2021
(jayant patil order ncp activists to create booth committee for 2024 elections)