विरोधक म्हणतात सरकार पडणार; गुलाबराव म्हणाले, कधी? तारीख सांगता का?
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सुरू असून वाद वैयक्तिक पातळीवर गेले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी संयम ठेवावा.
नंदूरबार: विरोधकांकडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचं भाकीत करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यातच हे सरकार कोसळणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटाने तर मध्यावधी निवडणुका कधीही लागतील निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेशच दिले आहेत. मात्र, शिंदे गटाने सरकार पडण्याची आणि मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळली आहे. सरकार पडणार असल्याचं विरोधक सांगत आहेत. ठिक आहे. त्यांना काहीही भविष्यवाणी करू द्या. पण सरकार कधी कोसळणार याची तारीख तर सांगा; असा खोचक टोला गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नंदुरबार नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यापासून ते सीमा प्रश्नांवर पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांना भविष्य पाहण्याची गरज नाही. ते भविष्यकाराचे भविष्य सांगतील. राजकारणात नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावनांच्या आदर करावा लागतो. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
आदित्य ठाकरे देशातील युवा नेत्यांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करणार आहेत. त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. या संदर्भात गुलाबराव पाटील यांनी बोलताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे जर महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची गरज भासली नसती, अशी बोचरी टीका केली.
महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील ग्रामपंचायतीचा साधा वार्ड सुद्धा कर्नाटकमध्ये जाऊ देणार नाही. राज्य सरकारसाठी हा प्रश्न संवेदनशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सुरू असून वाद वैयक्तिक पातळीवर गेले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी संयम ठेवावा. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दोन्ही नेत्यांनी बोलताना संयम ठेवावा. कुणी आरे केले तर दुसरा कारे करेल. त्यामुळे सामाजिक जीवनात वागताना तारतम्य ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नाहीत. त्यामुळेच हा या पक्षात जाईल, तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात. त्यामुळे या आरोपांना किती महत्त्व द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचंही ते म्हणाले.
राज्यातील महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. निवडणुका ही प्रशासकीय बाब असून याचा कोणी काही अर्थ काढू नये. जो तो पक्ष याचा आपल्यासाठी सोयस्कर पद्धतीने अर्थ काढत असतो, असंही ते म्हणाले.