Video : रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, 80 ते 90 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली, नेमकं काय घडलं?
रायगडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली. 35 घरातील 32 लोक जागीच मृत्यूमुखी पडले आहेत.
रायगड : रायगडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली. 35 घरातील 32 लोक जागीच मृत्यूमुखी पडले आहेत. तर सुमारे 80 ते 90 लोकं ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाड तालुक्यातील तळई गावात (Raigad Talai Village) ही भीषण दुर्घटना घडली. तळईवर दुखा:चं डोंगर कोसळला आहे.
तळईत दरड कोसळली, 32 लोकांचा जागीच मृत्यू , 80 ते 90 मातीखाली, नेमकं काय घडलं…?
काल संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. तुफान पावसामुळे ही दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. संध्याकाळच्या सुमारास तुफान पाऊस सुरु होता. याच पावसात तळई गावातील 35 घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत 32 लोकांचा जागीच मृत्यू झालाय तर 80 ते 90 लोकं मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याची भीती आहे.
दरड कोसळण्याची घटना कळताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 लोकांचे मृतदेह बाजूला काढले. पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण येत होता, अशी माहिती इथल्या स्थानिकांनी दिली आहे. तर शासनाने लवकरात लवकर मदत पोहोचवावी, अशी याचना इथले ग्रामस्थ करत आहेत.
मदतीला उशीर का झाला?
ही घटना काल संध्याकाळी 4 च्या सुमारासची आहे. मात्र त्यावेळी दमदार पाऊस कोसळत होतो. त्यामुळे मदत कार्यात अडथळा येत होता. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हेलिकॉप्टर ऑपरेशन शक्य नव्हतं. रोडही बंद होते. आता पावसाने उसंत घेतली आहे. आता एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
दुसऱ्या दिवशी एनडीआरएफ टीम पोहोचली, प्रवीण दरेकरांचा संताप
दरम्यान, काल दुपारी 4 वाजता ही घटना घडली. त्यानंतर स्थानिकांनी मृतदेह काढण्यास सुरुवात केली. परंतु प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. आज सकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून आता त्यांनी मदत कार्य सुरू केलं आहे. प्रशासन झोपलं आहे का?, असा संताप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. तसंच विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, अशा शब्दात तळई गावातून दरेकरांनी आपला संताप व्यक्त केला.
80 लोक दबल्याची भीती
या दुर्घटनेत 80 लोक दबल्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. ही घटना मोठी आणि दुर्देवी असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून हेलिकॉप्टर मागवावे, असं दरेकर यांनी सांगितलं.
निगरगट्ट प्रशासन पाहिलं नाही- महाजन
एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासकिय यंत्रणा घटनास्थळी पोहोचत नाही. घटनेला आता चोवीस तास होतील. मात्र अजूनही प्रशासनाकडून पाहिजे तेवढी मदत मिळत नाही. एवढं निगरगट्ट प्रशासन मी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
संबंधित बातमी :
Raigad Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, तळई गावात भीषण दुर्घटना