नांदेडमधून अमित शहा यांच्याकडून महाराष्ट्रात लोकसभेत 45 जागा जिंकण्याचा संकल्प
भाजपने नांदेडमधून लोकसभा निवडणुकीसाठीचं रणशिंग फुंकलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तब्बल 45 जागा महाराष्ट्रातून निवडून आणणार, असा मोठा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याचं अमित शाह यांनी जाहीर केलं.
नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची नांदेडमध्ये जाहीर सभा झाली. अमित शाह यांच्या भाषणाआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षात किती चांगली कामे झाली याचं विश्लेषण केलं. त्यानंतर अमित शाह यांनी भाषण केलं. अमित शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत असताना मोठा दावा केला. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 45 जागा जिंकण्याचा निर्धार केल्याची घोषणा अमित शाह यांनी यावेळी केला.
“देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे”, असं मोठं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. त्यामुळे भाजपने आता लोकसभेच्या 45 जागा जिंकण्यासाठी निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला विकासात पुढे आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले, अशा शब्दांत अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
अमित शाह भाषणात काय-काय म्हणाले?
“सर्वात आधी माझ्यासोबत शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करुयात. मी आज नांदेडच्या पवित्र भूमित आलो आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा 350 वं वर्ष आहे. मी शिवरायांना प्रणाम करुन माझ्या भाषणाला सुरुवात करतो. नांदेडच्या भूमीला गुरुगोविंद सिंह यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांच्या पुण्यस्मृतींना नमस्कार करतो”, असं अमित शाह म्हणाले.
“मराठवाड्याचा प्रांत एकेकाळी हैदराबादचा भाग होता. पण नांदेड आणि मराठवाड्याला देशाला स्वातंत्र्य मिळालेला नव्हता. इथल्या जनतेला अमानुष राजवटीचा सामना करावा लागला. 17 सप्टेंबर 1948 ला स्वातंत्र्य मिळालं होतं”, असं शाह म्हणाले.
“भाजपचं सरकार आणि मोदींच्या नेतृत्वातील सरकारने आज नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. मी नांदेड आणि महाराष्ट्राच्या जनतेचा धन्यवाद बोलायला आलो आहे. महाराष्ट्राच्या जनतेने खुल्या मनाने भाजपला मतदान केलं होतं. मोदी सरकारचे 9 वर्ष हे भारत गौरव, विकासाचे ठरले आहेत. हे वर्ष गरीब कल्याणाचे वर्ष ठरले आहेत. 10 वर्षाच्या काँग्रेस सरकारनंतर मोदी सरकार आलं तेव्हा सर्वच क्षेत्रात परिवर्तन घडवण्यात आलं”, असा दावा अमित शाह यांनी केला.
“सोनिया-मनमोहन सरकारमध्ये शरद पवार हे देखील होते. हे सरकार सर्वात भ्रष्ट सरकार होतं. 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला. गेल्या 9 वर्षात आमचे विरोधत आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करु शकत नाहीत. आधी देशात बॉम्बस्फोट व्हायचे. त्यावेळी मनमोहन सिंह यांच्या मुखातून काहीच बोल निघायचे नाही. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला घरात घुसून मारलं. नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात गरीब कल्याणाची कामे झाली”, असंही अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले.