Amol Kolhe : अमोल कोल्हे उपचारासाठी मुंबईत येणार; घोड्यावर बसल्याने पाठीला दुखापत
अमोल कोल्हे यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग करत असताना त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईत आणण्यात येणार आहे.
कराड : प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. नाटकाचा प्रयोग सुरू असताना घोड्यावर बसल्यावर त्यांच्या पाठीत जर्क आला आणि पाठीचा कणा दुखू लागला. त्यामुळे त्यांना प्रचंड वेदना झाल्या. अशाही अवस्थेत वेदनाशमक औषधे घेऊन त्यांनी कालचा शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग केला. आज महाराष्ट्र दिन असल्याने अमोल कोल्हे दुखापतीने बेजार असूनही आजही या महानाट्याचा प्रयोग करणार आहेत. त्यानंतर ते मुंबईत उपचारासाठी येणार आहेत. तशी माहिती त्यांनीच दिली आहे.
कराड येथे ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रयोगादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. आम्ही आज कराडला महाराष्ट्रदिनी शेवटचा प्रयोग करून मी ट्रिटमेंटसाठी रवाना होणार आहे. मात्र पूर्वनियोजनाप्रमाणे 11 मे पासून पिंपरी चिंचवड येथे महानाट्याचे प्रयोग सुरू होतील.https://t.co/hEv41DHaT3 pic.twitter.com/mVJM1rN6YB
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 1, 2023
कराड येथे ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रयोगादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. आम्ही आज कराडला महाराष्ट्रदिनी शेवटचा प्रयोग करून मी ट्रिटमेंटसाठी रवाना होणार आहे. मात्र पूर्वनियोजनाप्रमाणे 11 मे पासून पिंपरी चिंचवड येथे महानाट्याचे प्रयोग सुरू होतील, असं अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कोल्हे आजचा प्रयोग संपवून अमोल कोल्हे हे मुंबईकडे रवाना होणार आहेत. मुंबईत ते उपचार घेणार आहेत. मुंबईत कोणत्या रुग्णालयात उपचार घेणार याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
मणक्याला दुखापत
कराड येथील कालच्या प्रयोगादरम्यान संभाजी महाराजांच्या वेषात कोल्हे घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला. त्यामुळे पाठीला जर्क बसून कोल्हे यांच्या मणक्याला दुखापत झाली. तरीही त्यांनी वेदनाशामक औषधे घेऊन हा प्रयोग केला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधून या दुखापतीची माहिती दिली. तसेच त्यांना प्रयोगाबाबतचं निवेदनही दिलं.
काय म्हणाले कोल्हे?
जय शिवराय. खरं तर एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करत आहे. काल ज्यांनी प्रयोग पाहिला असेल त्यांच्यापैकी कोपऱ्यात बसलेल्या काही चाणाक्ष प्रेक्षकांच्या ध्यानात आलं असेल. काल घोड्यांचा राऊंड घेत असताना घोड्याचा मागचा पाय दुममडाला आणि पाठीला जोराचा जर्क बसला. त्यामुळे पाठीच्या मणक्याला थोडी दुखापत झाली आहे. या दुखापतीवर लवकरात लवकर उपचार करणं गरजेचं आहे. म्हणजे कालचा प्रयोग आणि आजचाप प्रयोग हा मसाज रिलॅक्शन आणि पेन किलर घेऊन घेऊन करतोय. पण उद्याचा (1 मे रोजीचा) प्रयोग हा कराड नगरीतील शेवटचा प्रयोग असेल. माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव.
जेव्हा एखादी इंज्युरी वेळेत नीट झाली तर बरं असतं. त्यामुळे उद्याचा प्रयोग (1 मे रोजीचा) हा शेवटचा प्रयोग असेल. ज्यांनी 2 आणि 3 तारखेची अॅडव्हान्स तिकीटं काढली असेल त्यांना पर्याय उपलब्ध आहे. त्यांचं 2 आणि 3 तारखेचं तिकीट हे उद्याच्या प्रयोगासाठी गृहित धरलं जाईल आणि उद्या त्यांना शक्य नसेल तर त्यांच्या तिकीटाची रक्कम दिली जाईल. पण अचानक उद्भवलेल्या दुखापतीमुळे मी सांगू इच्छितो की, 1 मे रोजीचा कराडचा प्रयोग शेवटचा असेल.
11 मेपासून पिंपरी चिंचवडमध्ये प्रयोग होणार आहेत. त्यामुळे उपचार घेऊन पुन्हा छत्रपती संभाजी महाराज यांचा हा इतिहास सांगण्यासाठी त्याच तारखेला मी तुमच्यासमोर उभा राहील. त्यामुळे उद्याचा प्रयोग (1 मे रोजीचा) शेवटचा राहील. आयोजकांचीही मी दिलगिरी व्यक्त करतो. अशा दुखापती ठरवून होत नाही. पण अचानक झालेल्या दुखापतीमुळे मी आयोजकांचीही दिलगिरी व्यक्त करतो.