गौतमी पाटील हिचा कार्यक्रम अचानक बंद, गुन्हे दाखल करण्याची धमकी, पोलिसांनीही टेकले हात; नेमकं काय झालं?
गौतमी पाटील हिचा काल पंढरपुरात कार्यक्रम होता. यावेळी पुन्हा एकदा प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली. त्यामुळे पोलिसांना लोकांवर लाठ्या चालवाव्या लागल्या.
पंढरपूर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. इतकी गर्दी होते की कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्यांवर पोलिसांना लाठीमार करावा लागतो. काही हुल्लडबाजांमुळे इतर सर्वांनाच त्याचा त्रास होतो. गौतमीच्या कार्यक्रमातील गर्दी आवरणं अशक्य असतं, हे माहीत असूनही तिच्या कार्यक्रमांना अजूनही प्रचंड मागणी आहे. तिला महाराष्ट्रभरातून कार्यक्रमाला बोलावलं जात आहे. गौतमीही आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करत कार्यक्रमाला हजेरी लावत असते. काल पंढरपुरात गौतमीचा कार्यक्रम होता. यावेळेही तिच्या कार्यक्रमात झुंबड उडाली अन् पोलिसांना हुल्लडबाजांना लाठीचा प्रसाद द्यावा लागला.
पंढरपूरच्या वेळापूर येथे हा कार्यक्रम होता. गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यावर अख्खं वेळापूर कार्यक्रमासाठी हजर झालं होतं. वेळापूरच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील आणि तालुक्यातील अनेक तरुण आणि बापये कार्यक्रमाला आले होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. लोकांना बसायलाही जागा नव्हती. पब्लिक स्टेजवर येऊ नये आणि स्टेजला कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून स्टेजभोवती बॅरिकेड्स लावण्यात आल्या होत्या. गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आणि सुरु झाल्यानंतर लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जात होतं. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वांनी आपआपल्या जागेवर शांतपणे बसून घेणं पसंत केलं.
अन् लाठीचार्ज सुरू झाला
मात्र, गौतमी पाटील आपल्या सहकारी कलाकारांसोबत स्टेजवर येताच एकच हंगामा सुरू झाला. त्यानंतर गौतमीने गाण्यावर ठेका धरताच पब्लिकच्या शिट्ट्यांचा पाऊस सुरू झाला. पब्लिकने एकच कल्ला केला. काही तरुणांनी तर जागेवरच ठेका धरला. काही जण तर पुढे येण्यासाठी सरसावत होते. कुणीही जागेवर बसलेलं नव्हतं. सर्वजण जागेवर उभे राहून डान्स करत होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. माईकवरून लोकांना वारंवार शांत राहण्याचा सूचना दिल्या जात होत्या. पण पब्लिक काही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी थेट लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. तरीही पोलीस काही ऐकायला तयार होईना.
फोटो बघून गुन्हा दाखल करू
सर्वांना विनंती आहे. गडबड करू नका. फोटो बघून गुन्हे दाखल होतील. गडबड गोंधळ करू नका, असं आवाहन माईकवरून करण्यात येत होतं. पण तरुण काही ऐकायला तयार होत नव्हते. त्यांची हुल्लडबाजी सुरूच होती. तुम्हा बघून तोल माझा गेला. तुम्ही सावरायला गप्पकन आला… हे गाणं सुरू झाल्यावर साइड कलाकारांनी डान्स सुरू करताच तरुणांनी अधिकच गोंधळ केला. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही हातात काठ्या गच्च पकडून प्रेक्षकांना चोप दिला. मात्र, तरीही लोक ऐकत नव्हते. त्यामुळे अखेर गोंधळ अधिकच वाढल्याने या कलाकारांनी कार्यक्रम बंद केला. त्यानंतरही प्रेक्षकांना शांततेचं सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात होतं. पण प्रेक्षक काही ऐकायला तयार नव्हते. त्यांची हुल्लडबाजी सुरूच होती.