जे येतील त्यांना सोबत घेऊ, जे येणार नाहीत त्यांच्या… पृथ्वीराज चव्हाण यांचा सूचक इशारा; रोख कुणाकडे?
आमदार गाडीत झोपून जातात हे मीडियाने दाखवलं. त्यावर मी काही भाष्य करणे योग्य वाटत नाही, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांना लगावला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
सातारा | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट घेतली. एका उद्योगपतीच्या घरी ही भेट झाली. या भेटीमुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात साटंलोटं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला असून राष्ट्रवादीतही संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीत फूट पडली की राष्ट्रवादी एकसंघ आहे हेच कार्यकर्त्यांना कळायला मार्ग नाही. राजकीय वर्तुळातूनही पवार काका-पुतण्याच्या भेटीचे वेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत. या सर्व चर्चा झडत असतानाच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
जे येतील त्यांना बरोबर घेऊन, जे येणार नाही त्यांच्याविरोधात जाऊन महाविकास आघाडी आम्ही मजबूत करू, असा इशारा देतानाच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवार यांना ही संभ्रम दूर केला पाहिजे, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट शरद पवार यांनाच नाव न घेता सूचक इशारा दिल्याचंही बोललं जात आहे.
कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करा
अजित पवार शरद पवार यांच्या अनेक भेटीनंतर राज्यात राष्ट्रवादीसह राजकीय क्षेत्रात पवारांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र काल शरद पवारांनी आपण इंडिया आघाडी सोबत असल्याचं स्पष्ट केल्याने हा त्यांच्या बाबत असलेला संभ्रम मिटला आहे. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम पवारांनी थेट मार्गदर्शन करुन दूर करावा, अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
पवारांचं स्वागत, पण…
इंडिया आघाडी सोबत असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. पवारांच्या भूमिकेचे स्वागत आहे. मोदींच्या विरोधात ते लढत आहेत. त्यांचयावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्याबरोबर जे आहेत ते मोदींच्या विरोधात लढायला तयार आहेत का? याबाबतचा संभ्रम अजून गेलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
ती मोदींची स्टाईल आहे
मी परत येईन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या घोषणेचीही त्यांनी खिल्ली उडवली. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाला कोणाचे मार्गदर्शन घेतले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मी पुन्हा येईन ही घोषणा आपण महाराष्ट्रात पूर्वी ऐकलेली आहे. त्या घोषणेचे पुढे काय झालं? हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मोदी पुन्हा येईन म्हटले याला मी जास्त महत्त्व देत नाही.
लाल किल्ल्यावरून राजकीय भाषण केलं. पुढच्या वर्षी निवडणूक आहेत निवडणुकीपूर्वीच त्यांचं शेवटचं भाषण असल्याने ती निवडणुकीची सभा व्हायला नको होती. पण ती मोदींची स्टाईल आहे, असा टोला त्यांनी लगावला.
तुमच्या घोषणेवर कोण विश्वास ठेवेल?
भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचं मोदी म्हणत असले तर तुम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मंत्रिमंडळात घेऊन देशासमोर उदाहरण ठेवलेलं आहे. भोपाळच्या भाषणात राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची घोषणा करता आणि दोन दिवसांमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री करता, तुमच्या भ्रष्टाचाराविरोधाच्या घोषणेवर कोण विश्वास ठेवेल? असा सवाल त्यांनी केला.
राज ठाकरे खरेच बोलले
राज ठाकरे म्हणाले मी तेच सांगितलं की, भाजपला विचाराने पक्ष वाढवता आलेला नाही. पक्ष फोडून पक्ष वाढवायचा हा मोदी पॅटर्न आहे, असा राज ठाकरे म्हणाले. ते खरंच आहे, असं सांगत चव्हाण यांनी राज ठाकरे यांच्या विधानाला दुजोरा दिला.