शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार का रखडलाय?; माजी मुख्यमंत्र्यांचा नेमका दावा काय?
मी दिल्लीतून महाराष्ट्रात आलो आणि आमदार म्हणून मी काम केलं, हे मात्र खरं आहे. पण कोणत्याही विरोधकाला मी मदत केली नाही, असा खुलासा चव्हाण यांनी केला.
सातारा: राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या सहा महिन्यांपासून रखडला आहे. फक्त लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल एवढंच सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात विस्ताराचा मुहूर्त काही सत्ताधाऱ्यांना सापडत नाहीये. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही विस्ताराची ठोस तारीख सांगत नाहीये. तसेच विस्तार का लांबलाय याचं कारणही दिलं जात नाहीये. त्यामुळे सत्ताधारी पक्षांच्या आमदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. काही आमदार तर मंत्रिपदाची लॉटरी लागेल या आशेवर शिंदे गटात आले. तर काही आमदारांनी मंत्रिपद सोडून शिंदे यांच्या बंडाला साथ दिली. त्यांनाही वेटिंगवर ठेवलं गेलं आहे. त्यामुळे या आमदारांमध्ये धाकधूक वाढलेली असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? याचं नेमकं कारण सांगितलं आहे.
आतापर्यंत ज्या पोटनिवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढलीये त्या ठिकाणी भाजपचा धुव्वा उडालेला आहे. आता अशी परिस्थिती अशी आहे की, आपलं सरकार टिकेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे शिंदे सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. यामुळे रोज दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होतंय. तसेच प्रशासनाविषयी न बोललेलं बरं, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
एकत्र लढलो तर…
भविष्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तर आमचा विजय हा निश्चित आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र मिळून लढलं पाहिजे, असं आव्हानच पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे.
बोलाचीच कढी, बोलाचाच भात
महाविकास आघाडीला निवडणुकीची स्वप्न बघू द्या. मात्र 200 हून अधिकचा आकडा भाजप आणि शिंदे सरकारला मिळणार असल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला होता. देसाई यांना चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमदार संख्या 288 आहे. तुम्ही 200 वरचा का थांबला? असा सवाल करत बोलाचीच कढी, बोलाचाच भात अशी अवस्था भाजप आणि शिंदे गटाची झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.
चव्हाण यांचा खुलासा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे थेट दिल्लीतून आले आणि मुख्यमंत्री झाले. त्यांना आमदारकीचा काही अनुभव नसताना ते मुख्यमंत्री झाले आणि यामुळेच आमच्यात समन्वय कमी झाला. त्यावेळी त्यांनी विरोधकांना मदत देखील केली, असा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांच्या आरोपालाही चव्हाण यांनी उत्तर दिलं.
मी दिल्लीतून महाराष्ट्रात आलो आणि आमदार म्हणून मी काम केलं, हे मात्र खरं आहे. पण कोणत्याही विरोधकाला मी मदत केली नाही, असा खुलासा चव्हाण यांनी केला. मात्र मला अनुभव जरी नसला तरी राज्याच्या हिताचे चांगले निर्णय त्यावेळी घेतले, असंही ते म्हणाले.