पंकजा मुंडे नाराज आहेत काय?, भाजपला सोडचिठ्ठी देणार काय?; रामदास आठवले यांनी दिली ‘ती’ माहिती
सर्वांना एकच सांगणे आहे की काँग्रेस आणि विरोधीपक्ष हे हिंदू-मुस्लिम समाजात भांडण लावण्याचे काम करत आहे. त्यामुळे त्यांचं न ऐकता आमच्यासोबत राहावं, असं आवाहन रामदास आठवले यांनी मुस्लिमांना केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
नगर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. त्यातच पंकजा मुंडे यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने पंकजा मुंडे राव यांच्या पक्षात जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपने आधीच या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मात्र, पंकजा मुंडे यांनी त्यावर काहीच भाष्य न केल्याने त्या बीआरएसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ही चर्चा सुरू असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. आठवले यांनीही पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या वृत्तात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
पंकजा मुंडे नाराज नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा पराभव करून त्या पुन्हा राजकारणात सक्रिय होतील. त्या निवडून आल्यानंतर त्यांचा सत्तेतही सहभाग होईल. त्या मंत्री होतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. पंकजा मुंडे जर आमदार असत्या तर नक्कीच त्या आज मंत्री असत्या असेही आठवले म्हणाले. चंद्रशेखर राव यांनी त्यांना कितीही आवाहन केल असलं तरी त्या बीआरएसमध्ये जाणार नाहीत. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला महाराष्ट्रात एवढं काही यश मिळेल असं वाटत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांची भीती वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ती पवारांची मुत्सद्देगिरीच
रामदास आठवले यांनी यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली होती. पवार यांची ही खेळी मुत्सद्देगिरीच होती. मात्र आता मोदी चांगले काम करत असताना शरद पवार यांनी सोनिया गांधी आणि इतरांचे एकूण आमच्यावर टीका करू नये, असा चिमटा आठवले यांनी काढला.
आंबेडकरांची ती कृती अयोग्य
यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. औरंगजेबाचा उदो उदो करणे योग्य नाही. प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकणं हे आंबेडकरी जनतेला आवडलं नाही. मुस्लिम समाजातील तरुणांनीही औरंगजेबाचा उदो उदो करू नये. भारतातले जे मुसलमान आहेत ते पूर्वी हिंदूच होते. हिंदू होण्यापूर्वी ते बौद्ध होते. बौद्ध होण्यापूर्वी ते वैदिक होते. त्यामुळे हे बाहेरून आलेले मुसलमान नाही. हिंदूंनी मुसलमानांना समजून घेणे आणि मुसलमानांनी हिंदूंना समजून घेणे गरजेचे आहे, असं त्यांनी सांगितलं.