Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांचं हेलिकॉप्टर भरकटलं, शेवटी पायलटचा महत्त्वाचा निर्णय, नेमकं काय घडलं?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आज अचानक अडचणीत सापडले. पण दैव बलवत्तर म्हणून कोणतीही चुकीची आणि अनपेक्षित घटना घडली नाही. पडळकर आज खेडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करावी लागलीय.
रत्नागिरी | 17 ऑक्टोबर 2023 : भाजप आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आज खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर सध्या वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली होती. तसेच अजित पवार यांना लबाड लांडग्याचा पिल्लू, असं म्हणत टीका केली होती. तर सुप्रिया सुळे यांना लबाड लांडग्याची लेख असं म्हणत निशाणा साधला होता. गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेमुळे अजित पवार गट चांगलाच आक्रमकदेखील झाला. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन केलं.
गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीकडून प्रचंड टीका झाल्यानंतरही ते गप्प बसले नाहीत. त्यांनी नुकतंच कोल्हापुरात केलेल्या भाषणात पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पडळकर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर भाषण करत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. तसेच शरद पवार हे जाती-जातीत भांडणं लावतात, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांना माज आणि मस्ती आली कुठून? असा सवाल करत घणाघातही केला. त्यांच्या या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
गोपीचंद पडळकर यांचं हेलिकॉप्टर भरकटलं
गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने शरद पवारांवर टीका केली जातेय. या सर्व घडामोडींदरम्यान गोपीचंद पडळकर हे आज अडचणीत सापडले होते. गोपीचंद पडळकर यांची सध्या धनगर जागर यात्रा सुरु आहे. त्यांची ही यात्रा आज रत्नागिरीच्या खेड तालुक्यात दाखल झालीय. पडळकर या दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. यावेळी अनपेक्षित गोष्टी घडली. पण सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
गोपीचंद पडळकर खेड दौऱ्यावर हेलिकॉप्टरने जात होते. यावेळी अचानक वादळी वारे वाहू लागले आणि मुसळधार पाऊस पडायला लागला. त्यामुले हेलिकॉप्टरला पुढे जाता येत नव्हतं. वातावरण प्रचंड खराब झालेलं होतं. त्यामुळे हेलिकॉप्टर पुढे सरकत नव्हतं. या दरम्यान हेलिकॉप्टर वादळी वाऱ्यांमुळे भरकटलं. त्यामुळे पायलटला हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घ्यावा लागला. गोपीचंद पडळकर हे सुखरुप आहेत. त्यांची खेडमध्ये सभाही पार पडलीय.