शिलालेख सांगतो सांगलीचा इतिहास, पलुस तालुक्यातील अकंलखोपमध्ये 900 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा
सध्या सांगली जिल्हयात समाविष्ट असणारे अंकलखोप हे गाव साडेनऊशे वर्षांपूर्वी करहाड-4000 या प्रांतात अंतर्भूत असल्याचे या शिलालेखावरून स्पष्ट होते. या लेखात अंकलखोपचा उल्लेख 'अंकुलखप्पु' असा आला आहे.
सांगली : जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकीर्दीतील इसवी सन 1077 सालचा जैन शिलालेख सापडला आहे. महामंडलेश्वर जोगम कलचुरी याने अंकलखोप येथील जैन मंदिराचा जीर्णोध्दार करताना हा दानलेख लिहून ठेवला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे. महेंद्र बाळकोटगी यांनी याचे वाचन केले. पलूस तालुक्याचा समावेश त्यावेळी कराड प्रांतात होता, हे या शिलालेखातून स्पष्ट होते. जोगम कलचुरीचा हा महाराष्ट्रातील पहिला शिलालेख आहे.
शिलालेख उजेडात कसा आला?
कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या अंकलखोप गावाला प्राचीन इतिहास आहे. येथील म्हसोबा देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात मोठी ऐतिहासिक परंपरा या गावाला आहे. येथील शिवव्याख्याते अतुल पाटील यांनी गावात शिलालेख असल्याची माहिती समाधीकोशकार प्रवीण भोसले यांच्या मार्फत मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना दिली. सदर शिलालेख अंकलखोप मधील जैन गल्ली रोडलगत चौगुले यांच्या घराच्या अंगणात आहे. या ठिकाणी गजलक्ष्मीचे शिल्प असून ते भावकाई म्हणून पूजले जाते. याच गजलक्ष्मी मागे शिलालेख असलेली दगडी शिळा मातीत पुरून ठेवण्यात आली आहे. दरवर्षी आषाढ अमावस्येला भावईच्या मानकऱ्यांसमोर ही शिळा काढून त्या खाली मडक्यात दिवा ठेवण्यात येतो. या शिळेवर अक्षरे असल्याचे मानकऱ्यांना माहित होते. मात्र, ती वाचता येत नसल्याने ही दरवर्षी बाहेर काढून धार्मिक विधी झाला की मुजविण्यात येत असे.
गावाचा ऐतिहासिक ठेवा उजेडात यावा यासाठी गावकरी आग्रही
गावातील इतिहासप्रेमी, शिवव्याख्याते अतुल पाटील यांनी या शिळेवरील अक्षरांचा छडा लावायचा असा निश्चय केला. मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना बोलावून गावातील मानकऱ्यांसमोर शिलालेख असलेली शिळा बाहेर काढण्यात आली. या शिलालेखाचाअभ्यास व्हावा, गावचा इतिहास समोर यावा म्हणून डॉ. जयवर्धन पाटील, अतुल पाटील, प्रणव देशपांडे, महेश चौगुले, श्रद्धेश गायकवाड, राहूल चौगुले, शिरीष गुरव, प्रा. प्रताप पाटील, डॉ. रोहीत सकळे, सागर कांबळे (शंबर्गी), सर्व मानकरी, युवक आणि ग्रामस्थांनी निश्चिय केला आणि संशोधकांना सहकार्य केले.
शिलालेखात दडलेला इतिहास नेमका काय?
अंकलखोपमधील या शिलालेखावर मध्यभागी पद्मप्रभ तीर्थंकरांची प्रतिमा, बाजूला गाय-वासरू आणि सुर्य चंद्राचे शिल्पांकन आहे. खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर आहे. प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी शिलालेखाचे ठसे घेऊन त्याचा अभ्यास केला. महेंद्र बाळकोटगी यांनी या लेखाचे वाचन करून दिले. या शिलालेखात एकूण 61 ओळी आहेत. या शिलालेखात त्रिभुवनमल्ल म्हणजेच चालुक्य राजा विक्रमादित्य याचा उल्लेख आला आहे. चालूक्य विक्रमादित्य हा महापराक्रमी होता. त्याने 50 वर्षे राज्य केले. त्याच्या काळात चालुक्य राज्याच्या सीमा गुजरातपासून दक्षिणेत तामिळनाडू पर्यंत भिडल्या होत्या.
अंकलखोपच्या या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्याचा मांडलिक असलेल्या जोगम कलचुरी याने अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून अंकलखोप येथील जैन मंदिराचा जीर्णोध्दार सुरु केला. त्यासाठी 9 एप्रिल 1077 रोजी हा दान लेख लिहून ठेवला. हा जोगम कलचुरी त्यावेळी विक्रमादित्याच्या वतीने कराड प्रांताचा कारभार पाहत होता.
काय आहे शिलालेखात
अंकलखोप येथे सापडलेल्या या शिलालेखात चालुक्य विक्रमादित्यासह त्याचा महामंडलेश्वर जोगम कलचुरी यांची विशेषणे लिहिण्यात आली आहेत. शके 999, पिंगल संवत्सरे, वैशाख शुध्द त्रयोदशी बृहस्पतीवासरे असा कालोल्लेख आहे. जैन धर्मातील यापणीय संघातील वृक्षमूल गणातील जैन साधूची ही बस्ती असून त्याच्या जीर्णोध्दारासाठी दान दिल्याचे म्हटले आहे.
अंकलखोप होते कराड प्रांतात
सध्या सांगली जिल्हयात समाविष्ट असणारे अंकलखोप हे गाव साडेनऊशे वर्षांपूर्वी करहाड-4000 या प्रांतात अंतर्भूत असल्याचे या शिलालेखावरून स्पष्ट होते. या लेखात अंकलखोपचा उल्लेख ‘अंकुलखप्पु’ असा आला आहे. जोगम कलचुरी हा कराड येथे वास्तव्यास असताना त्याने हे दान दिल्याचा उल्लेख असून त्याकाळी अंकलखोप हे भरभराटीस आल्याचे दिसते.
इतर बातम्या:
छगन भुजबळांनी निधी विकला, माझ्याकडे 500 पुरावे, शिवसेना आमदाराची थेट हायकोर्टात धाव
Sangli Palus Ankalkhop old kannada inscription reserach reveal history of sangli work done by Miraj Itihas Sanshodhan Mandal