Exclusive : संजय राऊत यांनी उदयनराजे, शिवेंद्रराजे यांना सुनावले; म्हणाले, तुम्ही रस्त्यावर एकमेकांचे वाभाडे…
या महाराष्ट्राने औरंगजेबाला गाडलं आहे. त्याच्या कबरीवरील माती किती वेळा उकरायची? भाजपला शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मिळत नाही म्हणून औरंगजेबाचा आधार घेत आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. शिवेंद्रराजे यांच्या हस्ते होणारा एक कार्यक्रम उदयनराजे भोसले यांनी उधळून लावला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या वादावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राजांना चांगलेच फटकारले आहे. आम्ही जेव्हा तुमच्याविरोधात काही बोललं तर तो छत्रपतींच्या गादीचा अपमान होतो. मग तुम्ही रस्त्यावर उतरता तेव्हा गादीचा अपमान नसतो का?, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीशी विशेष संवाद साधताना राऊत यांनी दोन्ही राजांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.
आम्ही जेव्हा एखादी टीका टिप्पणी करतो तेव्हा तो गादीचा अपमान ठरतो. तुम्ही रस्त्यावर एकमेकांचे वाभाडे काढता तेव्हा तो गादीचा अपमान ठरत नाही का? तु्म्ही दोघेही छत्रपतींचे दोन वशंज, वारस आहात. आम्ही तुमच्याविषयी लोकशाही मार्गाने काही भाष्य केलं तर तो शिवरायांचा अपमान होतो, गादीचा अपमान होतो. हे तुम्हीच दोन राजे बोलत असता. पण तुम्ही दोन राजे साताऱ्याच्या रस्त्यावर येऊन भांडतात. तेव्हा आम्हालाही वाटते हा गादीचा अपमान होतो. दोन राजे ज्या पद्धतीने एकमेकांवर धावून जात आहेत… आता फक्त तलावारीच काढायचं बाकी आहे. हा गादीचा अपमान नाही का? आपण काय करत आहोत हे दोघांनी बसून ठरवलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
वारसा विसरून उभं राहतात
शिवाजी महाराजांचे वशंज अजूनही छत्रपती ही उपाधी लावतात हे दुर्देव असल्याचं विधान प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केलं होतं. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. मी असं म्हणणार नाही. लोक प्रेमाने त्यांना छत्रपती म्हणतात. शिवाजी महाराजांच्या कुटुंबाविषयी लोकांच्या मनात सद्भावना आहे. जनता त्यांना छत्रपती संबोधत असेल तर चांगलं आहे.
पण ते स्वत:च लावत असतील तर त्यावर काही म्हणणं नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप हे दोन योद्धे जगात निर्माण झाले. त्यांनी मोगलशाही विरोधात तलवार उचलली. ते कधीही झुकले नाहीत. त्यांनी कधी लाचारी पत्करली नाही. आजच्या प्रमाणे आताच्या राज्यकर्त्यांच्या दारात लोकं वारसा विसरून उभं राहतात. शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापप यांचा आदर्श आमच्यासमोर आहे, असं राऊत म्हणाले.
आधी लढू, जिंकू, मग नेता ठरवू
विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल? असा सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नेतृत्व जनता करणार. सत्ताधाऱ्यांना कशाला चिंता पाहिजे? कोण पंतप्रधान? कोण नेता? हे आम्ही आधी निवडणुका जिंकू, मग नेता ठरवू. या देशात जनतेला नेता नकोय. फक्त हुकूमशाही ढकला, हा दशतवाद चालला तो खतम करा असं लोक म्हणत आहेत. नेता जनतेतून निर्माण होतो, असंही त्यांनी सांगितलं.
आधी तुमचा हिशोब द्या
कोरोना काळातील भ्रष्टाचारावरून मुंबईत धाडी मारल्या जात आहेत. त्यावरूनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तुम्ही कोणाचे पैसे खाऊन 50-50 खोके दिले त्याचा हिशोब द्या. साताऱ्यात दरे नावाचं गाव आहे. तिथे तुम्ही शेती करता. त्या शेतीतून पैशाच्या नोटा येतात का? सरकार पाडण्यासाठी या शेतीतून 5 हजार कोटी रुपये पिकवले का? ते कुठून आणले? त्याचा आधी हिशोब दिला तर इतर हिशोब देता येईल, असं आव्हानच त्यांनी दिले.