हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे; संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चोरमंडळ म्हटलं आहे. तसेच किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचंही म्हटलं आहे.
कोल्हापूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं संसदीय गटनेते पद काढण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरू केल्या आहेत. शिवसेनेच्या या हालचालींवर संजय राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे. त्यांनी पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली पदं परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्याच्या सर्वच भागात शिवसेनेचे नेते, उपनेते, प्रमुख अधिकारी संपर्क करत आहेत. मूळ पक्ष आमच्यासोबत आहे. विधीमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही हे काल कोर्टानेही म्हटलं आहे. हा पक्ष इथे आहे. आमच्या गर्जनेपेक्षा लोकांची गर्जना ऐकायला जातोय. ही गर्जना काय आहे हे काल धाराशीवला पाहिलं असेल. धाराशीवला बच्चू कडूंना लोकांनी जाब विचारला. चोर डाकूंसोबत का गेला? अशी गर्जना केली. या गर्जनेला बळ देण्यासाठी आम्ही जात आहोत. कोल्हापुरात आम्हाला आमच्या बाजूने वातावरण दिसंतय. शिवसेनेतील फुटीच्या घटनेनंतर आधी होती त्यापेक्षा ही संघटना मजबूत होऊन विस्तारताना दिसतेय. आम्ही लोकांना भेटू. त्यांचा उत्साह मोठा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
विक्रांत घोटाळ्यातील पैसा कुठाय?
जर कायदा पोलीस कोणाच्या मर्जीनं नाचणार असतील तर अटक होणारच. आम्हाला अटक केली. सिसोदियांना अटक केली. आमच्या पदाधिकाऱ्यांनाही अटक केलीय. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली एका चोराने, सोमय्याने कोट्यवधी रुपये गोळा केले. हे कोट्यवधी रुपये राजभवनात जमा करू असं ते म्हणाले. हे पैसे कुठे गेले हे शेवटपर्यंत कळलं नाही. या चोरीचं ईओडब्ल्यू तपास करत होतं. अशा 28 चोरांना ईओडब्ल्यूच्या माध्यमातून क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला, अशी टीका त्यांनी केली.
कोर्टात याचिका दाखल करणार
जे विरोधात आहेत त्यांना अटक करायची. खोटे गुन्हे दाखल करायचे. पण लक्षात ठेवा 2024ला त्याचा हिशोब केला जाईल. विक्रांत घोटाळा कधी थांबणार नाही. दडपला जाणार नाही. मी स्वत: या घोटाळ्याची चौकशी का थांबवली, जनतेचा पैसा कुठे गेला यासाठी मी स्वत: कोर्टात याचिका दाखल करणार आहे. सोमय्याने हे कोट्यवधी रुपये कुठे ठेवले हे सांगावं आणि मगच बोलावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.