Sanjay Raut : संभाजी छत्रपतींना पुढे करून राजकारण करण्याचा डाव, विरोधकांची उडी फसली; राऊतांनी पुन्हा डागली तोफ
Sanjay Raut : संजय राऊत आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. या भेटीत संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय इतर राजकीय चर्चाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापूर: श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे देशासाठी आदरणीय आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराजांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचं कौटुंबिक नातं होतं, आजही आहे. काल श्रीमंत शाहू छत्रपतींनी (shrimant Shahu chhatrapati) भूमिका घेतली. त्यावर मी इतकंच म्हणालो की, कोल्हापूरच्या मातीत प्रामाणिकपणा आणि सत्य जिवंत आहे. शाहू घराण्याने आपली सत्यवादी परंपरा कायम ठेवली. मी कोल्हापूरला आहे. शाहू महाराजांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेईल, असं सांगतानाच मला जसा शाहू महाराजांविषयी आदर आहे. तसंच संभाजीराजेंवर (sambhaji chhatrapati) माझं प्रेम आहे. आम्हाला त्या वादावर राजकारण करायचं नाही. ज्यांनी राजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची उडी फसली आहे. त्यांनी उडी मारण्याची प्रयत्न केला. पण शिवसेनेचं मन साफ आहे. शिवसेना कधी पाठिमागून वार करत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितलं.
संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही तेव्हाच भूमिका स्पष्ट केली होती. दोन जागा शिवसेनेच्या आहेत. तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर शिवसेनेत या असं आम्ही संभाजीराजेंना सांगितलं होतं, असा पुनरुच्चार राऊत यांनी केला. तसेच छत्रपतींना समर्थक नसतात. संपूर्ण प्रजा छत्रपतींची असते, असंही राऊत म्हणाले.
आता महाविकास आघाडीचंच ठरलं पाहिजे
कोल्हापूरमध्ये एकत्रित निवडणूक लढण्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोल्हापूरमध्ये मंडलिक साहेब आहेत. राजेश क्षीरसागर रुग्णालयात आतहे. आता एक दोनजणांचं ठरलं असं चालणार नाही. महाविकास आघाडीचंच ठरलं पाहिजे. तुमचं ठरत नसेल तर मग आम्ही आमचा निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.
राऊत घेणार श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट
दरम्यान, संजय राऊत आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. या भेटीत संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय इतर राजकीय चर्चाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राऊत आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शिवसेना नेते अरुण दुधवडकरही उपस्थित राहणार आहेत.