VIDEO : मोठी बातमी ! उदयनराजे यांची दबंगगिरी, शिवेंद्रराजे यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळला; साताऱ्यात तणाव
साताऱ्यातील नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उद्घाटनावरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने उभे ठाकले आहेत. उदयनराजे भोसले समर्थकांनी उद्घाटनाचा हा कार्यक्रमच उधळून लावला आहे.
सातारा : साताऱ्यातून मोठी बातमी आहे. साताऱ्यात दोन राजे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. खिंडवाडी येथील शिवेंद्रराजे भोसले यांचा बाजार समितीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उदयनराजे यांनी उधळून लावला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते बाजार समितीच्या कार्यालयासमोर आले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आज सकाळी नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. त्यानिमित्ताने संपूर्ण तयारी करण्यात आली होती. तसेच शिवेंद्रराजे यांच्यासाठी कंटेनर ऑफिसही उभारण्यात आलं होतं. खिंडवाडी येथे हा कार्यक्रम होणार होता. पण उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन हा कार्यक्रम उधळून लावला. तसेच शिवेंद्रराजे यांचं कंटेनर ऑफिसही तोडून टाकलं. यावेळी उदयनराजे भोसले समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत शिवेंद्रराजे यांचा निषेधही नोंदवला.
पोलिसांचा बंदोबस्त
या घटनेमुळे शिवेंद्रराजे समर्थक आणि उदयनराजे समर्थक आमनेसामने आले आहेत. तसेच दोन्ही गावेही आमनेसामने उभे ठाकले आहेत. दोन्ही राजांमधील वाद विकोपाला गेल्याने खिंडवाडीत पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत.
कार्यक्रम झालाच
दरम्यान, या राड्यानंतरही नवीन जागेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी नारळ फोडून भूमिपूजन केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांनी शिवेंद्रराजे यांच्या समर्थनार्थ घोषणा देतानाच उदयनराजे भोसले यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यालय टाकण्यात आलं आहे. ती जागा उदयनराजे भोसले यांच्या मालकीची असल्याने हा वाद निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं.
स्मारकारवरून आमनेसामने
दरम्यान, साताऱ्यातील शिवतीर्थ येथे बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या उभारणीवरून उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने आले होते. दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर जोरदार टीका केली होती. शिवेंद्रराजे यांनी देखील उदयनराजे यांच्यावर टीका केली होती.