ठाण्याच्या गल्लीबाहेर तरी त्यांना कोणी विचारत होतं का?; अरविंद सावंत यांचा थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्ला
तुम्हीच आठवा, मुंबईतील कोणत्याही वॉर्डात त्यांना कोणी कधी कोणत्या कार्यक्रमाला बोलावलं होतं का? प्रभावी नेते म्हणून मुंबईत कुठे त्यांना भाषणाला बोलावलं होतं का?
यवतमाळ: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मुंबईत पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत होते का? त्यांना कधी कुणी मुंबईतील एखाद्या कार्यक्रमाला तरी बोलावल्याचं आठवतं का? ते कधी प्रभावी नेते होते का? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. त्यांना काय करायचं ते करू द्या. शिवसैनिक आमच्यासोबतच आहे, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.
खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यवतमाळमध्ये ठाकरे गटाने पहिल्यांदाच जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे. या निमित्ताने ठाकरे गट यवतमाळमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे.
या मोर्चाचं नेतृत्व अरविंद सावंत करत आहेत. या निमित्ताने त्यांच्याशी टीव्ही9 मराठीने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच हल्ला चढवला.
त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची काय तयारी करायची करू द्या. त्याने काय फरक पडत नाही. ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर त्यांना कोणी विचारत होतं का विचारा ना? मुख्यमंत्री म्हणून तुम्ही नावं घेता सगळीकडे.
तुम्हीच आठवा, मुंबईतील कोणत्याही वॉर्डात त्यांना कोणी कधी कोणत्या कार्यक्रमाला बोलावलं होतं का? प्रभावी नेते म्हणून मुंबईत कुठे त्यांना भाषणाला बोलावलं होतं का? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.
सध्या सरकारकडून मुद्दे भरकटवण्याचं काम सुरू आहे. रोज वर्तमानपत्रातून जाहिरात दिली जात आहे. मुंबईचं सुशोभिकरण करणार असल्याच्या वल्गना केल्या जात आहे. मूळात सुशोभिकरणाची संकल्पना आदित्य ठाकरे यांची होती. ही संकल्पना कृतीत येण्याच्या वेळी पाठित सुरा खुपसला गेला. आता त्याचं भांडवल केलं जात आहे, असा टोला त्यांनी लगावला.
कोणी आमदार, खासदार गेले म्हणजे शिवसेना खच्ची झाली हा भ्रम आहे. त्याचं उत्तर आज मोर्चातून मिळेल. शिवसेना ही शिवसैनिकांची आहे. शिवसैनिक जसा आहे तसा आहे. पालापाचोळा उडतो. हेमंत ऋतू आल्यावर. नवी पालवी फुटते. नवीन मुलं आमच्याकडे येत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
आम्ही राजकीय म्हणून मोर्चा काढत नाही. तुम्ही जो घोषणा आणि आश्वासनांचा ढिंढोरा पेटवत आहात त्याविरोधात मोर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेली कर्जमाफी आणि यांची कर्जमाफी यात फरक आहे. सोयाबीन आणि कापसाच्या भावावर हा मोर्चा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अयोध्येला राम मंदिर होणार, असं देशाचे गृहमंत्री अमित शाह सांगतात. पण आमच्या पोटाचं काय रे भाऊ? शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय त्यावर बोला. हा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आहे. जन आक्रोश मोर्चा आहे, असं ते म्हणाले.