अहो आश्चर्य… चक्क नंदूरबारमध्ये अवतरला जपान देश; अधिकाऱ्यांची कमाल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची धमाल
बांधकाम विभागाकडून ही चूक झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात 'जपान' हे गाव नसून 'जमाना' हे गाव आहे. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गावाचे नाव चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे.
नंदूरबार | 2 ऑगस्ट 2023 : जगात अशक्य असं काहीच नाही. कोणतीही गोष्ट सहज करणं शक्य आहे. आता तर तंत्रज्ञानाचा जमाना आहे. जग चंद्रावर गेलंय. मंगळावरही जीवसृष्टीचा शोध घेतंय. त्यामुळे कठिण असं काही राहिलं नाही. पण काही गोष्टी अशक्य प्राय असतात. त्या कधीच बदलता येत नाही. निसर्गात काही बदल झाले तरच त्या बदलता येतात. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा देश दुसऱ्या ठिकाणी कसा हलवणार? शक्यच नाही. भूगर्भात काही बदल झाले तरच ही किमया घडू शकते. पण भूगर्भ आणि निसर्गात कोणतीही किमया न करता नंदूरबारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठा चमत्कार घडवून आणला आहे. हा पराक्रम जग वेगळं करणारा जगावेगळा असाच आहे.
नंदूरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. बांधकाम विभागाकडून नवीन रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. या दिशादर्शक फलकामध्ये नंदुरबार जिल्ह्यात जपान नावाचं गाव असल्याचा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ बुचकळ्यात पडले आहे. जपान आपल्या जिल्ह्यात आहे आणि आपल्याला माहीत कसे नाही? असा प्रश्न या लोकांना पडला आहे. साता समुद्रपार असलेलं जपान हे गाव नंदुरबार जिल्ह्यात कसं आलं? असा सवाल या लोकांना पडला आहे. त्यामुळे जपान हे गाव कुठे आहे याचा शोध ते घेत आहेत?
जमानाचं झालं जपान
बांधकाम विभागाकडून ही चूक झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात ‘जपान’ हे गाव नसून ‘जमाना’ हे गाव आहे. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गावाचे नाव चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने लवकर हा फलक दुरुस्ती करावा. नवीन फलक लावावा, अशी मागणी आता प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
फलक पाहण्यासाठी गर्दी
दरम्यान, बांधकाम विभागाने चक्क गावाचं नाव बदलून जपान ठेवल्याने लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फलक पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. पंचक्रोशीतील लोक हा फलक पाहण्यासााठी येत आहेत. तसेच या फलकासोबतचा एक सेल्फीही घेत आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घोडचुकीवर दिलखुलास हसतही आहेत.
फलकावर काय?
या दिशादर्शक फलकावर एकूण सहा गावांची नावे लिहिली आहेत. डाब, तोडीकुंड, चिवलउतार, खुंटगव्हाण, ओरपाफाटा आणि जपान असं या फलकावर लिहिण्यात आळं आहे. चार रस्त्यांच्या जवळच हा दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे.
भाऊ, हा रस्ता कुठे जातोय?
हा रस्ता जमानाला जात आहे. पण दिशादर्शक फलकावर जमाना न लिहिता जपान लिहिलं आहे. त्यामुळे आम्हीही आश्चर्यचकीत झालो आहे की भाऊ हा रस्ता कुठे जातो? विदेशात जातो की कुठे जातो, असं डाबचा रहिवासी संदीप तडवी यांनी सांगितलं.