‘हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन महाराष्ट्र पेटवणार का?’ नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल
भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज बारसूत दाखल होत शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला नारायण राणे यांन प्रत्युत्तर दिलं.
सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आज बारसूत जाऊन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याची खिल्ली उडवली.
“रिफायनरीला विरोध करणाऱ्याला आमचा विरोध आहे. तो विरोध दर्शवणारी पत्रकार परिषद घेत आहोत. आज 6 मे आहे. बारसूत उद्धव ठाकरे प्रस्तावित जागेच्या परिसरात पोहोचले. ते सोलगावला गेले. ते काही लोकांना भेटले. त्यांची सभा झाली नाही. त्यांच्या सभेला परवानगी नाकारली म्हणून मी सुद्धा दौरा नाकारला”, अंस नारायण राणे म्हणाले.
‘उद्धव ठाकरे स्वत: कोण आहेत याची जाणीव त्यांना आहे का?’
“उद्धव ठाकरे आज बडबडले. त्यांनी अनेक धमक्या दिल्या. सरकारला उद्देशून, सरकारने हे करावं नाहीतर महाराष्ट्र पेटवीन सारखे त्यांचे काही वाक्य आहेत. पण उद्धव ठाकरे हे आज स्वत: कोण आहेत याची जाणीव त्यांना आहे का माहीत नाही. तसं ते म्हणताय. प्रकल्प उद्या हुकूमशाही करुन स्वीकारला तर महाराष्ट्र पेटवू असं ते बोलले. 40 तर गेले आता दहा ते बारा असतील”, असं नारायण राणे म्हणाले.
“महाराष्ट्रातील देशातील सर्वात कमी ताकदीचा पक्ष कोणता तर शिवसेना. चार प्रमुख पक्षांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. स्वत:ला दिर्घ काळ चालता येत नाही. कुणावर हात वर करु शकत नाही. तरीपण पेटवूच्या भाषेत का बोलतात? ते कळत नाही. जेमतेम मुख्यमंत्री होते”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची उडवली खिल्ली
“मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना अभिनंदन करण्यासाठी मंत्रालयात गेलो तेव्हा तिथल्या स्टाफने सांगितलं, साहेब यापूर्वीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात दोनवेळाच आले. जेमतेम तासभर बसायचे आणि जायचे आणि पेटवायला कुठे कधी फिरणार, कसे फिरणार? हॅलिकॉप्टरमधून मशाल घेऊन पेटवत जाणार की काय?”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी खिल्ली उडवली.
“मला म्हणायचं आहे, महाराष्ट्राच एवढे नेते आहेत. प्रकल्पाला विरोध करणारे नेते किती? मी कोकणातला आहे. शिवसेनेने कोकणात प्रत्येक विकासकामाला विरोध केलाय”, असा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला.