‘त्या’ अधिकाऱ्यांना वरून आदेश येत होते; हसन मुश्रीफ यांच्या मुलाचा गौप्यस्फोट
आम्ही सर्व चौकशीला सामोरे गेलेलो आहोत. चौकशीमध्ये त्यांच्या हाती काहीही लागलेले नसावं. माझं वडिलांशी अद्याप बोलणं झालेलं नाही. चौकशी झाल्यानंतर मी थेट कार्यकर्त्यांसाठी इकडे आलो.
कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल ईडी आणि आयकर विभागाच्या धाडी पडल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या धाडी पडल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे. तर मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना वरून आदेश येत होते. त्यानुसारच चौकशी केली जात होती, असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या घरावरील छापेमारी ही राजकीय हेतूने प्रेरित होती का? असा सवाल केला जात आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील निवासस्थानी काल पहाटे 6.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. ईडी आणि आयकर विभागाचे तब्बल 20 अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रे तपासतानाच कुटुंबातील काही लोकांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं सांगितलं जातं.
ईडी आणि आयकर विभागाची ही कारवाई तब्बल 12 तास सुरू होती. 12 तासानंतर हे अधिकारी निघून गेले. या सर्व प्रकारावर हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चौकशीला आम्ही सहकार्य केलं, चौकशी शांतेत झाली. सगळी उत्तरं आम्ही दिली आहेत. त्या अधिकाऱ्यांना वरुन आदेश दिले जात होते, त्यापद्धतीने चौकशी केली जात होती, असा दावा नाविद यांनी केला आहे.
आम्ही सर्व चौकशीला सामोरे गेलेलो आहोत. चौकशीमध्ये त्यांच्या हाती काहीही लागलेले नसावं. माझं वडिलांशी अद्याप बोलणं झालेलं नाही. चौकशी झाल्यानंतर मी थेट कार्यकर्त्यांसाठी इकडे आलो, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आधी नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली. आता अस्लम शेख यांच्यावर कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या सांगत आहेत. त्यावरून विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट केलं जात असल्याचं स्पष्ट होत आहे, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.