थेट लग्न मंडपात भरधाव रिक्षा घुसली, एकाचा मृत्यू; बुलढाण्यात एकाच दिवसात तीन अपघात; तिघे दगावले
बुलढाण्यात काल झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तीनजणांचा मृत्यू झाला. त्यात मायलेकींचा समावेश आहे. तर या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
बुलढाणा : बुलढाण्यात एकाच दिवसात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तीनजण ठार झाले. तर पाचजण जखमी झाले आहे. एक अपघात तर प्रचंड विचित्र होता. एक भरधाव रिक्षा थेट लग्नाच्या मंडपात घुसल्याने एकाचा मृत्यू झाला. रिक्षाचालक वेगळ्या समाजाचा असल्याने काही काळ तणाव झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात रात्रीच्या सुमारास एका लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटो घुसल्याने दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एक पुरुष गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्राथमिक उपचार करून अकोला येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे सजनपुरी परिसरात रात्री तणाव निर्माण झाला होता.
ऑटो रिक्षावाला विशिष्ट समाजाचा असल्याने आणि त्यातच जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने सजनपुरी परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. तणाव वाढू नये म्हणून सजनपुरी येथे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या परिसरात पोलिसांचा अजूनही बंदोबस्त असून तणाव पूर्ण शांतता आहे.
मायलेकी ठार
जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जनुना फाट्याजवळ काल ट्रॅक्टर आणि दुचाकी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील मायलेकीचा मृत्यू झाला. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परवीन बी उस्मान शाह आणि खुशी उस्मान शाह अशी अपघातात ठार झालेल्यां मायलेकिंची नावे आहेत.
तर यात वडील आणि दुसरी मुलगी जखमी झाली आहे. शाह कुटुंब मूळचे डोणगाव येथील रहिवाशी असून सध्या ते बाळापुरात राहतात. आईला भेटण्यासाठी उस्मान शाह पत्नी आणि दोन मुलींसह डोणगावला मोटारसायकलने येत होते. मात्र डोणगाव-आलेगाव रोडवरील जनुना फाट्याजवळील वळणावर गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला.
ट्रॅक्टरच्या धडकेत दोन जखमी
मलकापूरमध्ये बुलढाणा रोडवरील महेश भवनासमोर ट्रॅक्टरने धडक दिल्याने स्विफ्ट डिझायर दुभाजकावरून पथदिव्याच्या खांबावर आदळून भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोघेजण जखमी झाले आहेत. रात्रीच्या सुमारास घिर्णी येथील स्वप्निल दशरथ डांगे यांचा ट्रॅक्टर बुलडाणा रोडवरील गौरक्षण येथून बस स्थानकाच्या दिशेने जात होता.
याच दरम्यान भुसावळवरून एक स्विफ्ट डिझायर बुलडाण्याकडे जात होती. यावेळी ट्रॅक्टरने स्विफ्ट डिझायरला धडक दिल्याने ती दुभाजकावरून पथदिव्याच्या खांबावर जाऊन आदळली. या अपघातात ट्रॅक्टर देखील जागीच उलटले आणि स्विफ्ट डिझायरचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात कारमधील दोघे जखमी झाले असून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.