अजित पवार यांनी विचारधारा बदलली तर… अजितदादा यांना कंटाळून आघाडीतून बाहेर पडलेल्या नेत्याचं विधान काय?
अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा दर्शविल्यानंतर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
अमरावती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 2024ची वाट का पाहायची? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी अजितदादा बहुमताच्या बाजूने आले तर मुख्यमंत्री होऊ शकतात असं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे अजित पवार आणि रावसाहेब दानवे यांची विधाने जोडून राजकीय अर्थ काढले जात असतानाच राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एक विधान करून चर्चेत आणखी भर घातली आहे.
उदय सामंत हे अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी सामंत यांना गाठून अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर विचारलं. त्यावर सामंत यांनी कोणतेही आढेवेढे न घेता थेट प्रतिक्रिया दिली. अजितदादांची विचारधारा जर बदलली, त्यांनी आमची विचारधारा जर स्वीकारली तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहू. परंतु, प्रश्न विचारधारेचा आहे, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं. उदय सामंत यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत आल्यास काहीच अडचण नसल्याचं सूचित केलं आहे. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी अजितदादांच्या नावाने खापर फोडून शिवसेनेतून बाहेर पडलेले नेतेच आता अजित पवारांना स्वीकारत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मोदींचं सातवेळा कौतुक
अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर उरलेल्या शिवसेनेने बोलले पाहिजे. काँग्रेसने बोललेलं पाहिजे, उरलेली शिवसेना म्हणजे उभाठा आहे. शिवसेना सांगते आमचा मुख्यमंत्री होणार, काँग्रेस सांगते आमचा मुख्यमंत्री होणार… यावरून आवळलेली वज्रमूठ एकत्र नाही हे सिद्ध होते, असं सांगतानाच कालच्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी सात वेळा नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच
अजित पवार हे विरोध पक्ष नेते आहेत. त्यामुळे सरकार जाणार हे त्यांना सांगावच लागतं. असं सांगतच त्यांनी 25 वर्ष विरोधात राहावं. पुढील दीड वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील. आगामी काळात शिंदे -फडणवीस यांच्याच नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले.
रावसाहेब दानवे काय म्हणाले?
रावसाहेब दानवे यांनीही काल जालन्यात बोलताना मोठं विधान केलं होतं. अजितदादांची मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्वीपासूनची आहे. मागे त्यांना संधी आली होती. त्यांचे आमदार जास्त होते. पण काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. आता ते जर बहुमताच्या बाजूने आले तर मुख्यमंत्री होतील. नाही तर त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी 10 ते 20 वर्ष वाट पाहावी लागेल, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते.