Amravati :उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपींचे पाकिस्तान कनेक्शन उघड, एनजीओला होते बाहेरुन फंडिंग, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये क्रूरपणा उघड
उमेश कोल्हे यांची निर्घृणपणे गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या गळ्यावर 5 इंच रुंद, 7 इंच लांब आणि 5 इंच खोल जखम झाली होती, असे स्पष्ट झाले आहे.
अमरावती – नुपूर शर्माला (Nupur Sharma)पाठिंब्याची पोस्ट शेअर केल्याने अमरावतीत (Amravati murder)उमेश कोल्हे यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आलेली आहे. सहा आरोपींनी कोल्हे यांचा गळा चिरुन हत्या केली होती. कोर्टाने मुख्य आरोपी इरफान शेख याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका वर्गाला घाबरवण्याची ही हत्या करण्यात आल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA)आरोपांत नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान हा एक एनजीओ चालवत होता. त्या एनजीोला पाकिस्तान आणि अरब देशातून फंडिंग होत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. या प्रकरणात खासदार नवीनत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर शाहा यांच्या आदेशाने या प्रकरणात एनआयए चौकशी सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीला लूटमारीचा प्रकार म्हणून याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणात लपवून काही ठेवले नव्हते. आता तपास एनआयए करीत असल्याचे सांगितले आहे.
कोल्हेंचा पोस्टमार्टेम रिपोर्ट
उमेश कोल्हे यांची निर्घृणपणे गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या गळ्यावर 5 इंच रुंद, 7 इंच लांब आणि 5 इंच खोल जखम झाली होती, असे स्पष्ट झाले आहे. चाकूने केलेल्या वारामुळे त्यांच्या मेंदूतील वाहिन्यांचे नुकसान झाले होते, अशी माहितीही समोर आली आहे. त्याचबरोबर श्वासोश्वास करणारी रक्तवाहिनी, जेवण्याची वाहिनी आणि डोळ्यांच्या नसांनाही हानी पोहचली होती असे समोर आले आहे.
इरफानचे पाकिस्तानशी संबंध
या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान हा रायबर हेल्पलाईन नावाची एक एनजीो चालवत असल्याचे तपसात समोर आले आहे. या हेल्पलाईनशी 21 जण संबंधित होते, अशीही माहिती मिळाली आहे. हत्याकांडातील इतर आरोपीही या एनजीओशी संबंधित असल्याची माहिती आहे. या एनजीओला पाकिस्तान आणि खाडीच्या देशांतून मदत येत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केलेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला नागपुरातून अटक करण्यात आली.
इरफानने पैशांचे आमिष आणि धर्माच्या नावाने इतरांना केले तयार
इरफानने पैसे देण्याचे आश्वासन देत आणि धर्माच्या नावाने इतर पाच आरोपींना या गुन्ह्यासाठी तयार केल्याची माहिती आहे. डॉ. युसूफ खान या आरोपीने कोल्हे यांची पोस्ट काही संशयित व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड केली होती.
सीसीटीव्हीत हत्येचा थरार कैद
21 जुलै रोजी झालेली ही हत्या एका सीसीटीव्ही व्हिडिओत कैद झाली आहे. रात्री साडे दहा वाजता अमरावतीतील प्रभात चौकातील एका सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. दोन आरोपी उमेश कोल्हे याच्या मागे जात असल्याचे यात दिसते आहे. हत्येनंतर ते पळून जातानाही या सीसीटीव्हीत दिसतायेत.
मुलगा जवळ होता नाहीतर गळाच चिरला असता
ही घटना घडली, तेव्हा उमेश कोल्हे यांचा मुलगा आणि सून त्यांच्यापासून केवळ 15 मीटर अंतरावर होते. तीघेजण बाईकवर आले आणि त्यांनी अचानक वडिलांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचे त्याने सांगितले आहे. हल्लेखोर त्यांचा गळा चिरण्याच्या प्रयत्नात होते, मात्र आपण आल्याने ते पळून गेल्याचे त्यांच्या मुलाचा दावा आहे. यानंतर तातडीने कोल्हे यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. आता कोल्हे यांच्या कुटुंबीयांसमोर सुरक्षेची चिंता आहे.
आरोपी मोहम्मद युसूफ उमेश कोल्हे यांचा मित्र
या हत्याकांडातील एक आरोपी डॉ. मोहम्मद युसुफ हा कोल्हे यांचा चांगला मित्र होता. संशय येऊ नये म्हणून त्यांच्या अंत्ययात्रेतही हा आरोपी सहभागी झाला होता. उमेश यांनी या आरोपीच्या मुलीच्य लग्नासाठी, मुलाच्या शाळेच्या एडमिशनसाठी अनेकदा रोख मदत केली होती.